मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना यश आले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपने केली होती. यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रसुद्धा लिहिले होते. तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा याकरिता तो करमुक्त करण्यात यावा, असे फडणवीस यांनी ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते.