Tuesday , February 7 2023

दरडग्रस्त सुतारवाडी, केवनाळे गावांत केली आर्थिक मदत

पोलादपूर ः प्रतिनिधी

पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे आणि साखर ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे 22 जुलै रोजी दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (दि. 7) या दरडग्रस्त गावांचा पुन्हा एकदा दौरा केला. या वेळी त्यांनी दरडबाधित व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली.

या दौर्‍यात विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यासोबत महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर आपत्ती निवारण प्रतिनियुक्तीवर असलेले प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, प्रभारी तहसीलदार समीर देसाई होते. त्यांनी प्रशासकीय कामाचा आढावा दरेकर यांना सादर केला.

या वेळी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी बाधितांना शासनाची मदत पंचनाम्यानुसार मिळण्याआधीच आम्ही रोख स्वरूपात मदत केली असल्याचा दावा केला.

यानंतर पोलादपूर शहरातील दौर्‍यात दरेकर यांनी शिवाजीनगर बाजार पेठ, भैरवनाथ नगर, वाचनालय परिसरातील पूरग्रस्तांची विचारपूस केली. या वेळी दरेकर यांनी लवकरच माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आपण दिल्लीत जाऊन अर्थमंत्री तसेच सर्व संबंधित विमा कंपन्यांच्यासोबत चर्चा करून ज्यांच्या विमा पॉलिसी नाहीत त्यांनादेखील मदत कशी मिळेल या संदर्भात पाठपुरावा करणार आहोत, असे सांगितले.

भाजप तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, माजी जि. प. सदस्य अनिल नलावडे, नवापुरचे माजी नगरसेवक प्रदीप पवार, शहर अध्यक्ष राजा दीक्षित, महिला अध्यक्ष उज्ज्वला मराठे-शेठ, महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप ठोंबरे, महेश निकम, अनू पटेल, कलिका अधिकारी, तनुजा भागवत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply