श्रीवर्धन : प्रतिनिधी
समुद्रात मासेमारी करून आपला चरितार्थ चालविर्या कोळी समाजाचा नारळीपौर्णिमा हा महत्वाचा व मोठा सण असतो. श्रीवर्धन तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमाच्या 15 दिवस अगोदर मच्छीमार बांधव तांब्या किंवा कळशी भरून समुद्राचे पाणी घरी आणतात. देवघरात ठेवलेल्या या कलशाची ते पधंरा दिवस मनोभावे पूजा करतात.
पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र खवळलेला असतो. शिवाय हा कालावधी मत्स्यप्रजननाचा असल्याने कोळीबांधव या काळात मासेमारीसाठी खोल समुद्रात जात नाहीत. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा केल्यानंतरच ते मच्छीमारीसाठी समुद्रात जातात.
नारळीपौर्णिमेच्या दिवशी श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाड्यामधील कोळीबांधव पारंपरिक वेशभूषा करून सागराची पूजा करण्यासाठी जातात. महिला नऊवारी साडी व पुरूष कोळीरूमाल नेसून, डोक्यावर टोपी, हातामधे फल्लटी घेऊन खालूबाजाच्या तालावर नाचत वाजतगाजत, फटाक्यांचा आतषबाजी करीत सागराच्या पाण्याने भरलेल्या कलशाची मिरवणूक काढतात. ही शोभायात्रा बंदरावर आल्यानंतर सागराची यथोचित पूजा-अर्चा करून सागराला मानाचा श्रीफळ अर्पण केला जातो.
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, कुडगाव, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, शेखाडी, जीवना कोळीवाडा, मुळगाव कोळीवाडा, बागमांडला येथील बंदरावरही सागराची पूजा केली जाते.