Breaking News

यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होणार

गणेशात्सवासाठी ज्यादा एसटी बस सोडण्याचेही निर्देश

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यात दहीहंडी व गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, मात्र आता कोरोनाचा धोका कमी झाला असल्याने या वर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करता येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासन, सार्वजनिक मंडळांचे प्रतिनिधींसह गुरुवारी (दि. 21) सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली.
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले. फेब्रुवारी 2022पासून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने टाळेबंदीचे नियम शिथिल करून सार्वजनिक जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले आहे. त्यातच आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरे होणारे सण म्हणजे दहीहंडी व गणेशोत्सव. त्यामुळे यावर्षीपासून हे सणही निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. दहीहंडी सण थरांबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्व सार्वजनिक मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा करावा, तसेच गणेशमूर्तींच्या उंचीवर असणारे निर्बंधही उठविण्यात आले आहेत. गणेशोत्सव, दहीहंडीसह इतर सण व्यवस्थित पार पाडले जावेत यासाठी येण्या-जाण्याच्या मार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत व्हाव्यात यासाठी एकखिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धतीने परवानग्या देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी कुठल्याही क्लिष्ट अटीशर्ती नसणार, यासाठी कुठलेही चार्जेस द्यावे लागणार नाही, याची सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी, नियमांचे पालन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, पण नियमांबाबत बागुलबुवा निर्माण केला जाऊ नये अशा सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
मुंबईत जी नियमावली आहे, त्याप्रमाणे राज्यातही व्हाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था राखून हे उत्सव साजरे झाले पाहिजेत अशा सूचना पोलीस, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply