नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
विभागीय भारतीय अजिंक्यपद आणि फॉर्म्युला-4 भारतीय अजिंक्यपद शर्यती देशात आयोजित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने हिरवा कंदील दिला आहे. रेसिंग प्रमोशन्सतर्फे फेब्रुवारी 2022मध्ये भारतातील नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर आणि हैदराबाद या शहरांत विभागीय अजिंक्यपद शर्यतींच्या आयोजनाची योजना आहे. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने प्रमाणित केलेल्या एफ 3 गाड्या या दोन्ही शर्यतींमध्ये सहभागी होऊ शकतील. या अजिंक्यपद शर्यतींद्वारे देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाचे अव्वल परवाना गुण जागतिक अजिंक्यपदासाठी शर्यतपटूंना कमावता येतील. विभागीय आणि फॉर्म्युला-4 शर्यतींसह भारतीय रेसिंग लीगसुद्धा देशात आयोजित करण्यासाठी संयोजक उत्सुक आहे. मोटार गाड्या आणि शर्यतींचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी देशात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. अरमान इब्राहिम, आदित्य पटेल या शर्यतपटूंसह माजी फॉर्म्युला-1 शर्यतपटू नरेन कार्तिकेयन आणि माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांचाही मार्गदर्शक आणि सल्लागार मंडळामध्ये समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली.