मुंबई ः प्रतिनिधी
डिसेंबरमध्ये होणार्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामासाठी ऑगस्टअखेरीस होणार्या लिलावाआधी एकूण 59 कबड्डीपटूंना संघांनी कायम राखले आहे, परंतु प्रदीप नरवाल, दीपक हुडा, राहुल चौधरी, सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार यांचा कायम राखलेल्या कबड्डीपटूंमध्ये समावेश नसल्यामुळे आगामी लिलावातील त्यांच्या किमतीची उत्कंठा वाढली आहे. मुंबईत 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत होणार्या प्रो कबड्डीच्या लिलावासाठी तीन विभागांमधून एकूण 59 कबड्डीपटूंना त्यांच्या संघांनी कायम राखले आहे. गतविजेत्या बंगाल वॉरियर्सकडून प्रो कबड्डीचा सातवा हंगाम गाजवणारा संघनायक मणिंदर सिंग, गत हंगामात सर्वाधिक चढायांचे गुण मिळवणारा बेंगळुरू बुल्सचा पवन शेरावत यांच्यासह 22 कबड्डीपटूंचा अव्वल श्रेणीतील विभागात समावेश आहे. फझल अत्राचाली (यु मुंबा), नितीश कुमार (युपी योद्धा), विकाश खंडोला (हरयाणा स्टीलर्स), परवेश भैन्सवाल आणि सुनील कुमार (गुजरात जायंट्स), आदी कबड्डीपटूंवरही त्यांच्या संघांनी विश्वास दर्शवला आहे.
– कायम राखलेले संघनिहाय कबड्डीपटू
बंगाल वॉरियर्स : मणिंदर सिंग, मोहम्मद नबीबक्ष, रिंकू नरवाल; बंगळुरू बुल्स : पवन शेरावत, अमित शेवरान; दबंग दिल्ली : विजय, नीरज नरवाल; गुजरात जायंट्स : परवेश भन्सवाल, सुनील कुमार; हरयाणा स्टीलर्स : विकाश खंडोला; जयपूर पिंक पँथर्स : अमित हुडा, विशाल; पाटणा पायरेट्स : नीरज कुमार, मोनू; पुणेरी पलटण : बाळासाहेब जाधव, पवन कुमार, हादी ताजिक; तेलुगू टायटन्स : राकेश गौडा; यु मुंबा : फझल अत्राचाली, अभिषेक सिंग, अजिंक्य कापरे, हरेंद्र कुमार; तमिळ थलायवाज, युपी योद्धाज : कुणीही नाही.
अव्वल श्रेणीतील कबड्डीपटू : 22
युवा कबड्डीपटू : 6
नवे युवा कबड्डीपटू : 31