पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबईला जाण्यासाठी महामार्गावर उभ्या असलेल्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलादपूर पोलिसांनी केवळ तीन तासात गजाआड केले. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द गोळयांचीवाडी येथील मनोहर बाबाजी सुर्वे हे शनिवारी सकाळी मुंबई येथे जाण्यासाठी पोलादपूर एसटी स्थानकाबाहेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभे होते. त्यावेळी तेथे आलेल्या मोटारसायकलस्वाराने तो महाड येथे जात असल्याचे सांगून सुर्वे यांना काटेतळी विन्हरे मार्गाने जाऊ असे सुचविले. वाटेत मोटरसायकलस्वाराने सुर्वे यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची 45 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून महाडच्या दिशेने पोबारा केला. या प्रकरणी सुर्वे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी पोलीस कर्मचारी व पोलीस मित्र गौरव मोरे, साहिल हातकमकर यांच्यासह महाडमध्ये जावून चोरट्याला ताब्यात घेतले.