कर्णधार विराट कोहलीचे संकेत
लंडन ः वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत मोठा पराभव होऊनही भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाच गोलंदाजांना खेळवण्याचे विधान केले आहे. असे असले तरी आता वेगवान गोलंदाजांच्या कामाचा ताण लक्षात घेऊन कोहलीने चौथ्या कसोटीत संघबदल करण्याचे संकेत दिले.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कोहलीने संघात अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा विचार नाकारला. 2 सप्टेंबरपासून द ओव्हल येथे चौथी कसोटी खेळवली जाणार आहे. यात इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यापैकी किमान एका गोलंदाजाला विश्रांती दिली जाऊ शकते.
कोहली म्हणाला, हे घडणे जवळजवळ निश्चित आहे. कारण ही एक तार्किक आणि समजण्याची गोष्ट आहे. आम्हाला गोलंदाजांवर इतका कामाचा दबाव आणायचा नाही की ते दुखापतग्रस्त होतील. त्यामुळे पाचव्या कसोटीपूर्वी कोणाला विश्रांतीची गरज आहे याचे आम्ही मूल्यांकन करू.
तिसर्या कसोटीतील कामगिरी पाहिली, तर इशांत शर्माला संघाबाहेर जावे लागू शकते. कर्णधार कोहलीने मात्र अद्याप कोणाचेही नाव घेतले नाही. जेव्हा कोहलीला विचारण्यात आले की, ईशांतला रन-अपमध्ये अडचण येत आहे का? त्यावर तो म्हणाला, मी त्याच्या रन-अपवर लक्ष केंद्रित केले नाही. कारण मी स्लिपमध्ये उभा होतो. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते. इंग्लंड दौर्यावर सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये अश्विनला बेंचवर बसावे लागले आहे. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तीन बळी घेतले. काऊंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळत असताना त्याने सहा विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, अपमानास्पद पराभवाला सामोरे गेल्यानंतर जेव्हा विराट कोहली पत्रकारांशी बोलला, तेव्हा त्याने पहिल्यांदा शांत शैली दाखवली. त्याच्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत विराटचा असा स्वभाव कोणीही पाहिला नव्हता. नेहमी आक्रमक असणारा विराट पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना बॅकफुटवर दिसला.