टोकियो ः वृत्तसंस्था
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा नेमबाजपटू सिंहराज अधाना याने पुरुष 10 मीटर एअर रायफल पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे. 216.8 गुणांसह त्याने हे पदक आपल्या नावावर केले. या पदकासह भारताच्या खात्यात यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत आठ पदके जमा झाली आहेत. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे.
पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात चीनच्या चाओ यांगने 237.9 गुण मिळवत पॅरालिम्पिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. चीनच्याच जिंग हुआंग याने 237.5 गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. सिंहराज अदाना याने 10 शॉट्समध्ये 99.6 गुण प्राप्त करत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले. पात्रता फेरीत अव्वस्थानी असलेला भारताचा मनीष नरवाल याला फायनलमध्ये लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयश आले. तो सुरुवातीलाच पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंहराज अदाना याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ‘भारताच्या आणखी एका नेमबाजाने आपल्यातील क्षमता दाखवून देत देशासाठी कांस्यपदकाची कमाई केली. कठोर मेहनतीनंतर मिळालेल्या अवस्मरणीय यशाबद्दल सिंहराज याचे खूप खूप अभिनंदन!’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी सिंहराजच्या कामगिरीला दाद दिली आहे.