जयपूर : वृत्तसंस्था
कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि रियान पराग यांनी केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर पाच गडी राखून मात केली आहे. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान राजस्थानने सहज पूर्ण केले.
मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे या सामन्यातही लवकर माघारी परतला. संजू सॅमसनने काही सुरेख फटके लगावले, मात्र राहुल चहरने त्याला माघारी धाडले. धोकादायक बेन स्टोक्सचा अडसरही चहरनेच दूर केला. यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि रियान पराग यांनी संघाचा डाव सावरत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्मिथने नाबाद 59, तर परागने 43 धावा केल्या. मुंबईकडून चहरने तीन बळी टिपले, तर बुमराहने एक गडी बाद केला.
त्याआधी, सलामीवीर क्विंटन डी कॉकचे अर्धशतक (65) आणि सूर्यकुमार यादव (34), हार्दिक पांड्या (23) यांची खेळी याच्या बळावर मुंबईने 20 षटकांत 5 बाद 161 धावा केल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपाळने दोन, तर तर जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.