माणगाव : प्रतिनिधी
कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार दोन दिवसांच्या पाचव्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 3) सकाळपासून दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्यावर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवार व रविवारी दोन दिवस माणगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनीसुनी वाटत होती. सोमवारी सकाळी दुकाने उघडल्यावर नागरिक दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. किराणा सामान, फळ विक्रेते, भाजीपाला आदि दुकानातून ग्राहक अधिक प्रमाणात दिसत होते. पोलीस व माणगांव नगरपंचायतीचे कर्मचारी बाजारपेठेत फिरून नागरिक व दुकानदारांना काळजी घेण्याबाबत सूचना करीत होते.
वीकेण्ड लॉकडाऊनच्या दुसर्या दिवशी तोबा गर्दी
अलिबाग : प्रतिनिधी
राज्यात गेल्या महिनाभर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र या लॉकडाऊनमध्येसुद्धा रुग्णसंख्येने टोक गाढले आहे. रायगड जिल्ह्याच्या रविवारच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास अलिबाग तालुका दुसर्या क्रमांकावर असल्याचे पहायला मिळते. तर वीकेण्ड लॉकडाऊनच्या दुसर्या दिवशी होणारी गर्दी पाहून, लॉकडाऊन कशाला ? असा प्रश्न निर्माण होतो.
अलिबाग तालुका दुसर्या क्रमांकावर : रायगड जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग पाहिला तर ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्याच पटीने रुग्ण बरेदेखील होत आहेत. पण असे असले तरी रुग्ण वाढीत अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यात दुसर्या क्रमांकावर आहे. मागील आठ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे लक्षात येते. अलिबाग तालुक्यात रविवारी (दि. 2) कोरोनांचे 225 नवे रुग्ण आढळून आले तर 64 बरे झाले, आणि आठ जण दगावले. अलिबागच्या तुलनेत पनवेल महानगरपालिका एक नंबरवर आहे. तेथे रविवारी 335 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 591 जण पूर्ण बरे झाले. रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्याचा रविवारपर्यंतचा आढावा घेतल्यास पनवेल ग्रामीणमध्ये नवे रुग्ण 145 आणि बरे 145, उरण 56 नवे 26 बरे, खालापूर 116 नवे 119 बरे, कर्जत 50 नवे 27 बरे, पेण 67 नवे 70 बरे, मुरुड तीन नवे 10 बरे, माणगाव 27 नवे 20 बरे, तळा पाच नवे , रोहा 57 नवे तीन बरे , सुधागड 15 नवे, 17 बरे , श्रीवर्धन पाच नवे, म्हसळा सहा नवे, तीन बरे, महाड 42 नवे, 46 बरे, आणि पोलादपूर तालुक्यात नऊ नवे तर आठ जण बरे झाले