Breaking News

कळंबोलीतील जम्बो कोविड सेंटर लवकरच सेवेत

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा; पनवेल महापालिका व सिडको अधिकार्‍यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीमुळे कळंबोली येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित होत आहे. 29 कोटी रुपये खर्च करून कोरोना साथरोगाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी बनविण्यात आलेले कळंबोली सीसीआय गोदामात 635 खाटांचे जम्बो कोरोना रुग्णालय पुढील आठवड्यात सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सोमवारी पनवेल पालिकेचे आयुक्त आणि सिडको मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली.

जिल्ह्याच्या तुलनेत पनवेल तालुक्यात बाधितांची संख्या मोठी असल्याने पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 जुलै 2020 रोजी पत्र देऊन केली होती, तसेच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनाही माहितीस्तव प्रत देण्यात आली होती.

या केंद्राचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण करण्यात येणार असून तिसर्‍या लाटेत या केंद्राचा मोठा आधार पनवेलकरांना मिळणार आहे. हे रुग्णालय बांधण्याचे काम सिडकोवर सोपविले होते. त्यानुसार सिडकोने गेल्या आठवड्यात पत्र देऊन त्याचे काम पूर्ण झाल्याचे पनवेल पालिकेला कळवले होते. त्यामुळे सोमवारी सिडको मंडळाचे अधिकारी व पनवेल पालिकेचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली.

या 635 खाटांच्या जम्बो कोविड केंद्रामध्ये 505 प्राणवायू खाटा, अतिदक्षता विभागात 130 खाटा असणार आहेत. या वेळी पनवेल पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, महापालिका मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सिडको मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर, अधीक्षक अभियंता रमेश गिरी, सिडको कार्यकारी अभियंता डी. एम. बोकाडे, कार्यकारी अभियंता यासीन मापरा, साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद जाधव, साहाय्यक कार्यकारी अभियंता राजेश थासले पालिका अधिकारी, सिडको अधिकारी उपस्थित होते.

बाधितांच्या दोन्ही हातांवर शिक्के गृहविलगीकरणातील बाधितांच्या दोन्ही हातांवर शिक्के मारण्यात येत आहेत. अनेक गृहविलगीकरणातील रुग्ण घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी पनवेल पालिकेकडे आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.

जम्बो कोविड केंद्राची पाहणी केली असून पुढील तीन दिवसांत आयटी व वैद्यकीय अधिकारी, सिडको अधिकार्‍यांसोबत संयुक्तपणे रुग्णालय हस्तांतरण प्रक्रिया पार पाडतील. त्यानंतर हे रुग्णालय पालिकेच्या ताब्यात आल्यावर रुग्णालय सुरू करणार आहोत. एकाच छताखाली पालिका क्षेत्रातील बाधितांना चांगले उपचार मिळावेत हीच अपेक्षा आहे.

-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply