Breaking News

निर्बंधांचा बागुलबुवा

गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अपेक्षेप्रमाणेच सत्ताधारी पक्षाचे नेते पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची भाषा करू लागले आहेत. याची अटकळ बहुतेकांना होतीच. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे भय दाखवून लोकांच्या वावरण्यावर निर्बंध लादण्याचे महाविकास आघाडी सरकारचे धोरण काही नवीन नाही. अशा प्रकारच्या भयाच्या राजकारणाचा पुरेपूर अनुभव महाराष्ट्राची जनता घेतच आली आहे.

कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. लोकांनी पुरेशी काळजी घ्यायलाच हवी. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु नेमक्या सणासुदीच्या दिवसांतच सरकारला निर्बंधांची आठवण का होते हा खरा प्रश्न आहे. गोकुळाष्टमीच्या सुमारास अशाच प्रकारचे वातावरण तयार करण्यात आले. कोरोनाचा बागुलबुवा पुढे करून गोविंदा पथकांचा हिरमोड करण्याचे कार्य महाविकास आघाडी सरकारने तडीला नेले. तेव्हाच गणेशोत्सवावर देखील निर्बंधांची कुर्‍हाड कोसळणार याचा अंदाज आला होता. सणवाराच्या निमित्ताने लोकांच्या एकत्र येण्याला राज्य सरकार कडाडून विरोध करते. त्याच वेळेस मॉल्स, दुकाने, बाजारपेठा आणि उपनगरी रेल्वेगाड्यांमधील गर्दीकडे काणाडोळा करते. निर्णयांमधली ही विसंगती कशामुळे, असा प्रश्न निर्माण होतो. हो-ना करता करता उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करताना राज्य सरकारने बरीच खळखळ केली होती. परंतु मुंबईकरांच्या रेट्यामुळे लोकल गाड्या अटीशर्तींसह सुरू करण्यात आल्या. दैनिक तिकिट तूर्त कुणालाही मिळणार नाही. लसींचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचा दाखला दाखवल्यास रेल्वेचा मासिक पास मिळू शकेल अशी अट सरकारने घातली. तरी देखील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये किती गर्दी असते हे सरकारात बसलेल्या मंत्र्यांनी स्वत: डोळ्यांखालून घालावे. सर्व प्रकारची गर्दी चालते, परंतु सण मात्र साजरे करू नका या सरकारच्या आग्रहाला राजकारणाचा दुर्गंध येतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोदी एक्स्प्रेस चालवण्याची घोषणा केली. या विशेष रेल्वेगाडीचा हजारो चाकरमान्यांना लाभ होणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा शुभारंभ दादर रेल्वे स्थानकावर मंगळवारी थाटामाटात झाला. यावेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी मुंबईकर प्रवाशांशी गप्पागोष्टी करत रेल्वेतून प्रवास देखील केला आणि त्यांची मने जाणून घेतली. अशा प्रकारचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा एक तरी मंत्री करताना दिसतो का? लोकांसाठी सत्ता राबवताना सत्ताधार्‍यांनी लोकांशी मिळून-मिसळून राहिले पाहिजे. परंतु आघाडी सरकारातील मंत्र्यांचे हेतूच वेगळे आहेत. मोदी एक्स्प्रेस सुरू होणार आणि त्यायोगे केंद्रातील मोदी सरकारला दुवा मिळणार या विचाराने कासावीस झालेल्या महाविकास आघाडी सरकारने अखेरच्या क्षणी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी टोलमाफी जाहीर केली. बुंद से गयी वो हौद से नहीं आती हा धडा राज्य सरकारात बसलेले नेते कधी घेणार कोण जाणे? राजकीय सभा आणि सरकारी उद्घाटन समारंभ यांना होणारी गर्दी सत्ताधार्‍यांना चालते. सत्ताधारी पक्षाचाच कार्यक्रम असेल तर तो देखील विनासायास पार पडतो. कोणावरही साधा नियमभंगाचा गुन्हा देखील नोंदला जात नाही. परंतु असाच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने आयोजित केला तर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या तळपायाची आग जणु मस्तकाला जाते. भाजपला मिळणारा जनतेचा उदंड प्रतिसाद पाहूनच गणेशोत्सवावर निर्बंधांचे जाळे फेकण्याचा हा प्रकार आहे. याच कारणासाठी महाराष्ट्रातील देवळे देखील बंद आहेत हे जनतेने लक्षात घ्यावे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply