Breaking News

मुंबईमध्ये दूषित पाणीपुरवठा

महापालिकेचा भोंगळ कारभार; नागरिक धास्तावले

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील महत्त्वाचे भाग असलेल्या दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जुन्या आणि खराब पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे पाण्याच्या दूषितेत वाढ झाल्याचे निरीक्षण समोर आले आहे. या दूषित पाण्यामुळे अतिसारासारखे आजार बळावू शकतात.

मुंबई महापालिकेच्या वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल (ईएसआर) 2020च्या आकडेवारीनुसार, दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड यासारख्या भागात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या दूषिततेत वाढ नोंदवली गेली आहे.

या कालावधीसाठी नागरी संस्थेने तपासलेल्या एकूण 29,051 पाण्याच्या नमुन्यांपैकी 275-0.94 टक्के दूषित आढळले. पाण्याच्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषण 3.4 टक्के जी-उत्तर प्रभाग (दादर, धारावी)मध्ये आढळले. त्यानंतर 2.4 टक्के पी दक्षिण (गोरेगाव), टी वॉर्ड (मुलुंड)मध्ये 2.3 टक्के आणि एफ-उत्तर (सायन, माटुंगा)मध्ये 2.2 टक्के इतके दूषित आढळले आहे. गेल्या वर्षी जी-उत्तरमध्ये प्रदूषण 1.5 टक्के होते, तर एफ-उत्तरमध्ये ते 0.1 टक्के होते. त्याचप्रमाणे, पी-दक्षिणमध्ये ते 1.3 टक्के होते तसेच टी प्रभागात ते 0.2 टक्के होते, असे अहवालातून समोर आले आहे. चाचणीसाठी गोळा केलेल्या एकूण पाण्याच्या नमुन्यांपैकी 275मध्ये ई-कोलाय जीवाणूंची उपस्थिती दिसून आली. ज्यामुळे अतिसार आणि पेचिशसारखे आजार होऊ शकतात. मानकांनुसार पिण्याचे पाणी ई-कोलीमुक्त असावे. दूषित पाणी खराब झालेल्या किंवा जुन्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे झाले असावे, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.मुंबई शहराला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. 27 सेवा जलाशय आहेत, ज्यातून पाणी गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि झोपडपट्ट्यांना पुरवले जाते. मुंबईत चार लाखांहून अधिक मीटरचे पाणी कनेक्शन आहेत. दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply