Tuesday , February 7 2023

झुडपात हरवले मध्य रेल्वेचे केळवली स्टेशन

खालापूर : प्रतिनिधी

फलाटावर वाढलेले गवत, झाडीझुडपे, इतरत्र पसरलेला केरकचरा, भटकी कुत्री, मोकाट गुरेढोरांसह साप व विंचू यांचा वावर यामुळे मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावरील केळवली स्टेशनला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

रेल्वे व्यवस्थापन उपनगरीय प्रवाशांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. केळवली स्टेशनमध्ये प्रवाशांना ना पाणी, ना प्रसाधनगृहाची सोय, ना बैठक व्यवस्था. अशा अनेक गैरसोईत  गुंतून पडलेले केळवली स्टेशन सध्या जंगली झुडपात हरवले आहे. भटकी कुत्री, गुरेंढोरे, विषारी साप व विंचू यांचा फलाटावर वावर असल्याने केळवली रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मात्र या समस्यांकडे मध्य रेल्वे प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.

कर्जत-खोपोली मार्गावरील केळवली, डोळवली या रेल्वे स्थानकांतील गैरसोयींबाबतचे वृत्त चार वर्षांपुर्वी दैनिक रामप्रहरमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने या स्टेशनमध्ये काही सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. या रेल्वे स्थानकांत परतीच्या प्रवासाची तिकीटे उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र पिण्याचे पाणी देण्यास रेल्वे प्रशासन अद्याप यशस्वी झाले नाही. केळवली, डोळवली, लौजी रेल्वे स्थानकात स्वच्छता गृहे निर्माण करण्यात आली, मात्र ती देखभाल व पाणी नसल्याने पडीक झाली आहेत. या पडीक स्वच्छता गृहांचा वापर गुर्दुले, बेवडयांचे आश्रय स्थान बनले आहे. तर बेवारसांचे आश्रम बनले आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला असून, येत्या मार्च महिन्यापर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पंकज ओसवाल यांनी दिली, तर कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील केळवली, डोळवली आणि लौजी या स्थानकांकडे रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाची ही बेफिकीर वृत्ती प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणारी असल्याचे प्रवासी प्रकाश हाडप (रा. केळवली) यांनी म्हटले आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply