उरण : वार्ताहर
50 वर्षांत जी कामे झाली नाहीत त्याहून अधिक पाच वर्षांत झाली. काँगे्रसने भ्रष्टाचार केला, तर भाजपने पारदर्शक कारभारावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न खाऊंगा न खाने दुंगा या नीतीने देश चालविला. देशात सुरू झालेला विकास अविरतपणे चालू राहण्यासाठी संसदरत्न बहुमानाने पाच वेळा सन्मानित झालेल्या श्रीरंग बारणे यांना संसदेत पाठवा. महायुतीचा प्रत्येक खासदार हा नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यात योगदान देईल, असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (दि. 22) उरण येथे केले. शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरणमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळा, पेन्शनर पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी, ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे महाआघाडीच्या पापाने भरलेल्या आमिषाला बळी न पडता देशासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन केले.
या सभेस आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह आदी उपस्थित होते. महायुतीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी होती.
उरणसह मावळ लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून द्या, असे आवाहन मनोहर भोईर यांनी केले.
भाजप नेते महेश बालदी म्हणाले की, उरणजवळील घारापुरी येथे देश स्वतंत्र झाल्यापासून वीज नव्हती. तेथे वीज आणण्याचे काम भाजप व शिवसेनेने केले आहे. करंजा येथे मोठा प्रकल्प आणण्याचे काम आम्ही केले. नगर परिषदेच्या विकासासाठीही निधी देण्याचे काम भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहे. पुढील काळात अनेक विकासाची कामे करण्याचा आमचा संकल्प आहे.
शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर यांचीही समयोचित भाषणे झाली. सभेस उपनगराध्यक्ष जयविन कोळी, जि. प. सदस्य विजय भोईर, मोतीराम ठोंबरे, पं. स. सदस्य दीपक ठाकूर, दिशा पाटील, नगरसेविका जान्हवी पंडित, वर्षा पाठारे, विद्या म्हात्रे, भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, कामगार नेते सुधीर घरत, युवा नेते शेखर तांडेल, जितेंद्र घरत, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा संगीता पाटील, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, उद्योजक प्रकाश ठाकूर, भास्कर मोकल, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, वैभव थोरात, सुजाता गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उरण तालुक्यातील सारडे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मनोज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले.