Breaking News

मुख्यमंत्र्यांची तोफ आज धडाडणार

कामोठ्यात जाहीर सभा; उत्सुकता शिगेला

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्राचा बुलंद आवाज असलेले भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा मंगळवारी (दि. 23) दुपारी 3 वाजता कामोठे सेक्टर 11 येथील नालंदा बौद्धविहार मैदानात होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ होणार्‍या या सभेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या सभेस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे; तर रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, रिपाइंचे कोकण अध्यक्ष, नगरसेवक जगदीश गायकवाड आदी नेते उपस्थित राहाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पनवेलवर विशेष प्रेम व लक्ष आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने खारघर टोलमधून स्थानिकांसह राज्यभरातील छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली, तर करंजाडे-नांदगाव येथील टोल थेट रद्द झाला. सरकारच्या इच्छाशक्तीतून पनवेल परिसरात अनेक प्रकल्प साकारत आहेत. त्यातून रोजगारनिर्मिती होणार असून, तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी पनवेल महापालिकेची 408 कोटींची अमृत योजना मंजूरकेली. प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत 414 कोटींची तरतूद केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी 83 गाड्या दिल्या, ज्यामुळे शहर चकाचक दिसते. त्याचबरोबर पनवेलच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी झुकते माप दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाजप नेत्यांनी जोरदार तयारी केली असून, अथक परिश्रम घेतले आहेत. ही सभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाला गवसणी घालण्यात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply