माणगाव : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरासह तालुक्यात सकाळी 8 ते दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने बाजारपेठेतून लोकांची गर्दी वाढताना दिसतआहे. यासाठी माणगाव शहरासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुकानांच्या वेळेत बदल करावा जेणे करून सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत गरजेची सर्व दुकाने सुरू ठेवल्यास होणार्या गर्दीचे प्रमाण निश्चितच कमी होईल, अशी मागणी व सूचना भारतीय जनता पक्षाचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ढवळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, सध्या माणगाव शहरासह तालुक्यातील गरजेची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 किंवा 1 यावेळेत सुरू ठेवण्यात आले असल्याने हे खरे तर सरकारच्या आदेशांचे उल्लंघन आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी सरकारच्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला नाही असे स्पष्ट केले होते. तरीपण माणगाव तालुक्यातील दुकाने केवळ पाच तास उघडी राहत आहेत. त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढून कोरोना विषाणूचा फैलाव तालुक्यात जास्तीत जास्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी विचार करून सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत गरजेची सर्व दुकाने सुरू ठेवल्यास गर्दीचे प्रमाण कमी होवून आपण कोरोना विषाणूवर मात करून निरोगी जीवन जगु असे संजयआप्पा ढवळे यांनी म्हटले आहे.