खोपोली, खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी
मुबंई-पुणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री बाराच्या सुमारास एका आयशर टेम्पोने अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.
मुबंईकडून पुण्याकडे जाणारा आयशर टेम्पो काही तांत्रिक बिघाड असल्याने महामार्गावरील रसायनी हद्दीत बंद पडला होता. पोलिसांच्या गस्ती पथकाने त्या टेम्पोला एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले होते. त्यानतंर काही वेळाने या टेम्पोने अचानक पेट घेतला.
आग आटोक्यात आणण्यासाठी खोपोली नगर परिषद, सिडको, रिलायन्स आणि आयआरबीच्या अग्नीशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत टेम्पोतील सौदर्य प्रसाधने, अगरबत्ती, वायर, इलेक्ट्रिकल साहित्य व विविध प्रकारच्या वस्तूसह आयशर टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. तसेच टेम्पोच्या केबीनमधील एक व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, गुरूनाथ साठेलकर, अमित गुजरे, यासिन शेख यांनी मृतदेह बाहेर काढून तो शविच्छेदनासाठी चौक येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविला. या वेळी मुबंई-पुणे द्रुतगती महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.