Breaking News

नेरळकर पीत आहेत गढूळ पाणी

जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याचा परिणाम

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ गेल्या काही दिवसापासून गढूळ पाणी पीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नेरळ पूर्व भागात गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चादेखील नेला होता. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणार्‍या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र गेल्या चार महिन्यापासून बंद असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

नेरळ गावासाठी 1998 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून साडेसात कोटींची नळ पाणीपुरवठा योजना केली. या पाणीपुरवठा योजनेची मुदत 2021 पर्यंत होती. मात्र 2021 साल संपायची वेळ आली तरी नेरळ गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली नाही. सध्याची पाणीपुरवठा योजना जुनी झाल्यामुळे नेरळच्या अनेक भागात आज कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, येथील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणी प्यावे लागत आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठा करणार्‍या योजनेतील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. त्या जलशुद्धीकरण केंद्राचे फिल्टर प्लांट पावसाळ्यापासून बंद असल्याचे बोलले जात असून, ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग केवळ आलम टीसीएल हे साहित्य पाणी शुद्ध करण्यासाठी टाकत असतात. पाणी शुद्ध करणारी यंत्रणा बंद पडल्याने उल्हास नदीमधून उचललेले गढूळ पाणी नळाद्वारे थेट घरोघरी पोहचत आहे. नेरळमधील दवाखान्यांत गेल्या काही दिवसांपासून ताप, सर्दी आणि खोकला या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत.

नेरळ पूर्व भागात गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील कार्यकर्ते कुमार गोपणे, योगेश पवार, एस. बी. बोडक, डॉ. श्याम पावरा, राहुल पाटोळे, प्राजक्ता उतेकर, संगीता पाटोळे, दीपाली पवार यांच्यासह काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता. ग्रामपंचायतीने त्यांना, या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र  जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर ग्रामपंचायत देऊ शकली नाही.

नेरळ पूर्व भागातील गटारे तुंबली आहेत, रस्त्याची स्थिती खराब आहे आणि जेमतेम दोन हंडे पाणी मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला गढूळ पाणी प्यावे लागत आहे.

-कुमार गोपणे, रहिवासी, निर्माण नगरी नेरळ

ग्रामपंचायतीकडून जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. अनेक व्हॉल्व्ह चोकअप झाले आहेत. गेली तीन दिवस त्यांची दुरुस्ती सुरू आहे. या आठवड्यात शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल.

-गणेश गायकर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत नेरळ

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply