अलिबाग : प्रतिनिधी
येथील आरसीएफ कॉलनीजवळ बुधवारी (दि. 13) दोन ट्रकची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक जखमी झाला. त्याच्यावर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.
उसर येथून एचपी गॅस घेऊन ट्रक चालक हा बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अलिबागकडे येत होता. चालकाला डुलकी लागल्याने अलिबागकडून रोह्याकडे जाणार्या बर्फाच्या ट्रकला गॅसच्या ट्रक चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन धडक दिली. या अपघातात बर्फ घेऊन जाणारा ट्रक चालक जखमी झाला. गॅसची वाहतूक करणार्या ट्रकचा चालक पळून गेला. नागरिकांनी जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. गॅसची वाहतूक करणार्या ट्रक चालकाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.