Breaking News

खालापूर तालुक्यातील गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू

खालापूर : प्रतिनिधी

स्वामित्व योजने अंतर्गत राज्यातील सर्व गावामधील गावठणांचा ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खालापूर तालुक्यातही 103 गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याची सुरुवात सोमवारी (दि. 25) माणकिवली गावापासून झाली.

स्वामित्व योजनेमुळे गावकर्‍यांना, शेतकर्‍यांना मालकी हक्क देण्याचा शासनाचा मानस असून जमिनीचे उतारे, नकाशे या योजनेने अचूक मिळणार आहेत. भविष्यात  गावठाण जमिनीच्या मालकीची सनद बहाल करण्यात येणार आहे. बँकांचे कर्ज, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना या सनदीचा वापर करता येईल.  राज्य शासनाचे अधिकारी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन चुना मार्किंग करणार आहेत तर चौकशी अधिकारी सर्वे करण्यात आलेल्या जमिनीचे नकाशे तयार करणार आहेत. हे नकाशे जतन केले जाणार असून संबंधीत शेकर्‍यांच्या अनेक पिढ्यांना या नकाशांचा पुरावा म्हणून वापर करता येईल.

खालापूर तालुक्यातील 103 गावांतील गावठाण  क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे काम ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  करण्यात येत आहे. कोकण प्रदेश भूमी अभिलेख उपसंचालक मिलिंद चव्हाण यांनी सोमवारी तालुक्यातील माणकिवली गावात ड्रोन कामाचा शुभारंभ केला. रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी या ड्रोन कामाचे नियोजन केले होते.

खालापूर तालुक्यातील 103 गावांत ड्रोनद्वारे होत असलेल्या गावठाण सर्वेक्षण कामकाजात जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी व उपअधीक्षक शरद काळे यांनी केले आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply