Breaking News

गंगेत घोडे न्हाले

संपूर्ण देशासमोरील सर्व समस्यांची पूर्तता झाली असून आर्यन खान प्रकरणाशिवाय देशात काहीही महत्त्वाचे शिल्लक नाही अशा प्रकारे गेले काही दिवस प्रसिद्धी माध्यमांनी धिंगाणा घातला होता. टीआरपीसाठी सुरू असलेल्या माध्यमांच्या मारामारीत राजकारणाने भर घातली आणि वैयक्तिक चिखलफेकीचा नवा तमाशा लोकांना बघायला मिळाला. शिमगा आणि धुळवड एकत्र सुरू असल्याचा गैरसमज महाराष्ट्राकडे कुणा त्रयस्थाने पाहिले तर नक्कीच होऊ शकेल.

कॉर्डेलिया एम्प्रेस या आलिशान जहाजावरील रेव्ह पार्टीसंदर्भात आर्यन खान आणि त्याच्या मित्रांना अंमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली. आर्यन हा सुपरस्टार शाहरुख खान याचा पुत्र असल्याने माध्यमांना कुरणच मिळाले. अखेर 25 दिवस आर्थर रोड कारागृहात काढल्यानंतर गुरूवारी सायंकाळच्या सुमारास उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही सशर्त जामीन मंजूर केला. अर्थात आर्यन खानला जामीन मिळाला या बातमीमुळे देखील माध्यमांना आणखी उधाण आले हे खरेच. परंतु मधल्या काळात सर्वांनाच बघायला मिळालेल्या राजकीय चिखलफेकीमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेचे किती हनन झाले असेल याची पर्वा कुणालाही नाही. महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जे वैयक्तिक हल्ले केले, ते दुर्दैवीच म्हणावे लागतील. वानखेडे यांच्या खाजगी जीवनाबद्दल उलटसुलट आरोप करताना मंत्रीमहोदयांनी एक टक्का देखील औचित्य बाळगले नाही. वानखेडे यांचा धर्म कोणता, जात कोणती, वानखेडेंच्या वडिलांची जात काय, आईचा धर्म कोणता अशा प्रकारचे अत्यंत हीन दर्जाचे प्रश्न उपस्थित करून जबाबदार म्हणवणार्‍या नेत्यांनी महाराष्ट्राची उरलीसुरली अब्रू देखील घालवली. अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग म्हणजेच एनसीबीच्या तपासकामाबाबत नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले आहेत, शंका उपस्थित केल्या आहेत. त्या शंकांचे निरसन कायदेशीर मार्गाने यथावकाश होईलच. एनसीबीचे कामकाज कशापद्धतीने चालावे हा काही राज्य सरकारच्या किंवा राज्यातील मंत्र्याच्या अखत्यारीतील विषय नव्हे. एनसीबी ही केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त रीतीने काम करते. या संस्थेच्या विरोधातील आक्षेप लवकरच दूर केले जातील अशी अपेक्षा आहे. तथापि एनसीबीच्या कामामध्ये काही सुधारणा हव्या असल्यास त्यासाठी एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याच्या खाजगी जीवनातील गोष्टी चव्हाट्यावर आणण्याची गरज नाही. सध्या तरी या लढाईला एनसीबीविरुद्ध नवाब मलिक असा रंग मिळाला आहे. आर्यन खानने खरोखरच गुन्हा केला की नाही हा मुद्दा कुठल्या कुठे दूर फेकला गेला. काही राजकारण्यांनी या प्रकरणाचा यथेच्छ गैरवापर केला एवढे मात्र यातून सिद्ध होते. आर्यन खान याला जामीन मंजूर झाला असला तरी निकालाची प्रत हाती येईपर्यंत त्याला तुरुंगातच रहावे लागणार आहे. अर्थात हेही नसे थोडके. सुपरस्टार शाहरुख खान याचा वाढदिवस 2 नोव्हेंबर रोजी असतो. त्याचे चाहते तो थाटामाटात साजरा करतात. त्याच्या वाढदिवसाला त्याचा पुत्र आर्यन घरी असेल अशी अपेक्षा आहे. यंदाची दिवाळी शाहरुख खान आणि त्याचे चाहते यांच्यासाठी बरी जाईल असे दिसते. एनसीबी आणि नवाब मलिक यांच्यातील राजकीय लढाई कायदेशीर वळण घेण्याच्या टप्प्यावर आहे. त्याचे पुढे काय होते याचा आँखो देखा हाल टीव्ही वाहिन्यांवरून घरोघरी कळेलच.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply