पनवेल ः रामप्रहर वृत्त
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अत्यंत संवेदनशील अशा ’मकर द्वार’ येथे चहा पार्टी आयोजित केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने रविवारी (दि.15) पनवेलमध्ये निषेध आंदोलन केले. शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालय येथे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन पार पडले. यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
या आंदोलनामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष व पं.स. उपसभापती भूपेंद्र पाटील, कळंबोली अध्यक्ष अमर पाटील, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, नगरसेविका सीताताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शिवाजी दुर्गे, योगेश लहाने, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, श्रीनंद पटवर्धन, अमित ओझे, प्रवीण मोहोकर, अप्पा भागीत, सतीश मालुसरे, अंकुश पाटील, दिलीप बिष्ट, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, तेजस जाधव, मयूर कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष संसद व संविधानाला मानणारा पक्ष आहे आणि त्यांचा अपमान आम्ही कधीही सहन करू शकत नाही. संसदेचे मकर द्वार हे अत्यंत महत्त्वाचे स्थान असून त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी चहा-बिस्किटांची पार्टी करून संसदेची प्रतिष्ठा कमी करण्याचे काम केले आहे. मकर द्वार हे काय पिकनिक स्पॉट आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करून संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 12 तारखेला घडलेली ही घटना संपूर्ण देशाची आणि लोकशाहीची बदनामी करणारी असल्याचेही नमूद केले.
Check Also
प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण वर्गाचा समारोप
पनवेल : रामप्रहर वृत्तप्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण हे केवळ शस्त्र चालवण्याचे नसून ते स्वतःबद्दलचा स्वाभिमान …
RamPrahar – The Panvel Daily Paper