पनवेल : रामप्रहर वृत्त
प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण हे केवळ शस्त्र चालवण्याचे नसून ते स्वतःबद्दलचा स्वाभिमान जागृत करण्याचे एक संकल्प शिबिर होते आणि हा संकल्प 100 टक्के यशस्वी झाला आहे. समाजात स्वाभिमानाने वावरण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक महिला भगिनीला मिळायला हवे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्ष तथा नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या पुढाकारातून प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण वर्ग शहरातील लोकनेते दि.बा. पाटील शाळेच्या मैदानावर 4 ते 11 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. त्याच्या सांगता समारंभात आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या प्रशिक्षण वर्गात 10 वर्षांवरील मुलींपासून ते महिलांपर्यंत अनेकींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षणादरम्यान महिलांना प्राचीन युद्धकलेचे बारकावे आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. या कलेचा सराव सातत्याने सुरू ठेवून आपल्यातील स्वधर्म आणि आत्मविश्वास जागृत ठेवण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे पनवेलमधील महिलावर्गात उत्साहाचे वातावरण दिसून आले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी महिलांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. महिलांना केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश नसून त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवणे हा होता, जो पूर्णपणे साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी महापौर नितीन पाटील, भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारूशीला घरत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, नगरसेवक बबन मुकादम, राजू सोनी, सुमित झुंझारराव, नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, रूचिता लोंढे, अॅड. शिवानी घरत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर उपाध्यक्ष केदार भगत, प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी, प्रशांत शेट्ये, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष मनीषा बहिरा, कविता ठाकूर, सोशल मीडिया प्रभारी संजीवनी भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि महिलावर्ग उपस्थित होता.
Check Also
महाराष्ट्रात प्रथमच ‘स्मार्ट पे किऑस्क’द्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा
पनवेल महापालिकेचा पुढाकार; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper