पनवेल ः रामप्रहर वृत्त
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन पनवेल तालुक्यातील कळंबोली मंडळाच्या वतीने खारघर सेक्टर 11 येथील श्री साईबाबा मंदिर परिसरात शनिवारी (दि. 14) करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आदिवासी बांधव तसेच परिसरातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखले थेट उपलब्ध करून देण्यात आले.
या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त वैशाली इंदाणी, प्रांत अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मीनल भोसले-भामरे, भाजप खारघर मंडळ अध्यक्ष नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका अनिता पाटील, मिनल पाटील, मनाली ठाकूर, दमयंती भोईर, लीला कातकरी, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, भाजप शहर सरचिटणीस दीपक शिंदे, प्रवीण बेरा, संजय घरत, ज्ञानेश्वर खरपुरिया, दीपक ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खारघर हे नवी मुंबईचे हृदय आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू यामुळे येथील परिसराला एक नवी ओळख मिळाली आहे. त्याचप्रमाणे आता शासन आपल्या दारी आल्यामुळे आपणास कुठेही जाण्याची आवश्यकता राहणार नाही आणि कोणत्याही लाभापासून पात्र नागरिक वंचित राहणार नाहीत.
कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त वैशाली इंदाणी यांनी आदिवासी बांधवांसाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकासाठी महसूल विभाग सदैव कार्यतत्पर आहे व जे लागेल ते सहकार्य करण्याची तयारी संपूर्ण महसूल विभागाची असल्याचे सांगितले.
प्रांताधिकारी पवन चांडक यांनी शासनाच्या विविध योजना आपल्यासाठी कशा उपयोगी आहेत व आधुनिक साधनांचा वापर करून त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा ते समजावून सांगितले. तहसीलदार मीनल भामरे-भोसले यांनी प्रस्ताविकातून शासन आपल्या दारी आणि समाधान शिबिराच्या माध्यमातून आपण कोणकोणते दाखले आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत याची माहिती दिली.
शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी, कृषी विभाग नोंदणी सेवा, भूमी अभिलेख विभागाकडून नकलप्रती व मोजणी अर्ज, सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्रे तसेच आयुष्मान भारत कार्ड नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर उपाय सुचवणारे लघु विज्ञान प्रदर्शन सादर केले. महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले होते.
यावेळी जातीचे दाखले, प्रलंबित फेरफार, सातबारामधील चुकांची दुरूस्ती, उत्पन्नाचे दाखले, आरोग्य योजना, भूमी अभिलेख योजना, आधार कार्ड दुरूस्ती यासारख्या अनेक प्रमाणपत्रांचे वाटप आणि विविध योजनांचा थेट लाभ एकूण एक हजार 428 नागरिकांना देण्यात आला.
Check Also
प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण वर्गाचा समारोप
पनवेल : रामप्रहर वृत्तप्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण हे केवळ शस्त्र चालवण्याचे नसून ते स्वतःबद्दलचा स्वाभिमान …
RamPrahar – The Panvel Daily Paper