प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांचा शोध

पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील प्रस्तरारोहक (रॉकर) मॅकमोहन हुले यांनी पालीतील सरसगड किल्ल्यावर नुकताच नवीन प्रस्तरारोहण मार्गाचा (स्पोर्ट्स क्लायंबिंग रूट) शोध लावला आहे. त्यांनी या मार्गाने दोन वेळा प्रस्तरारोहण मोहीम फत्ते केली आहे.
प्रस्तररोहण या खेळाला 2019 मध्ये ऑलम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे तरुणांना या खेळात नावलौकिक मिळविण्यासाठी संधी आणि वाव आहे. सरसगडावर प्रस्तरारोहणचे नैसर्गिक मार्ग आहेत. या मार्गांवर अनेक तरुण व मुले गिर्यारोहण व प्रस्तरारोहण करू शकतील. तसेच नवीन मार्गही शोधू शकतील, असे मॅक विला द जंगल यार्ड या संस्थेचे संस्थापक मॅकमोहन हुले यांनी सांगितले.
मॅक्मोहन यांनी आत्तापर्यंतची सर्वात उंच (710 फूट) प्रस्तरारोहण मोहीम 26 जानेवारीला केली होती. त्याच अनुभवातून त्यांनी सरसगडावरील हा नवा प्रस्तरारोहण मार्ग तयार केला आहे. ही चढाई तब्बल 150 फुटांची होती, अशी माहिती मॅकमोहन हुले यांनी दिली.
अशी केली थरारक चढाई
हुले यांनी सरसगडाच्या उजव्या बाजूला 10 ऑक्टोबर 2021 रोजी नवीन मार्गाने प्रस्तरारोहणाला सुरुवात केली. दुपारी पहिले रिंग बोल्ट आणि दुसरे रिंग बोल्ट फिक्स केले. मात्र त्यावेळी जोरदार वारा व पाऊस सुरू झाल्याने मोहीम अर्धवट सोडून ते खाली गावाकडे परतले. मात्र पुढील दोन दिवसांत ही प्रस्तरारोहण मोहीम त्यांनी दोनवेळा सुरक्षित पूर्ण केली गेली. या प्रस्तरारोहण मार्गावर आठ रिंग बोल्टचा वापर केला आहे. या मोहिमेत प्रस्तरारोहक मॅकमोहन, आउट डोअर एक्सपर्ट आयुष सिंग (उत्तम बीलेर) सहभागी झाले होते. या वेळी मदतीस दिनेश कदम, सुनयना काशीद, वर्धन विजयकर, मिहिर जोशी, अनिकेत व्हावळ, विजय मनवी व संदेश उतेकर हे उपस्थित होते.