हैदराबाद : वृत्तसंस्था
हैदराबादबरोबर झालेल्या मॅचमध्ये पाहुण्या मुंबईने यजमानांचा 40 धावांनी पराभव केला आहे. अल्झारी जोसेफच्या बॉलिंगसमोर कोणत्याच बॅट्समनला टिकता आले नाही. अल्झारी जोसेफने तब्बल 6 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी केवळ 137 धावांचे माफक आव्हान दिले होते. हैदराबादला केवळ 96 रनच करता आल्या. हैदराबाला 20 ओव्हर देखील खेळता आले नाही. हैदराबादची इनिंग 17.4 ओव्हरमध्येच आटोपली.
राहुल चहरने 2 तर बुमराह आणि बेहरनडोर्फने प्रत्येकी 1 विकेट घेत जोसेफला चांगलीच साथ दिली. अल्झारीने 3.4 ओव्हर टाकल्या. त्यातही 1 ओव्हरही निर्धाव टाकली. त्याने केवळ 12 रन देत 6 विकेट घेण्याची कामगिरी केली. अल्झारी जोसेफ आणि पोलार्ड हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
विजयासाठी दिलेल्या 137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली होती, पण पहिली विकेट गेल्यानंतर हैदराबादने नियमित अंतराने आपले विकेट गमावले. हैदराबादकडून दीपक हुड्डाने 20 रनची सर्वाधिक खेळी केली. यापूर्वी हैदराबादने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी आंमत्रित केले. मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, परंतु अखेरच्या टप्प्यात पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला 136 धावा करता आल्या. या विजयामुळे या पर्वातील मुंबईचा हा तिसरा विजय ठरला आहे. मुंबई टीम चेन्नईनंतर हैदराबादची विजयी घौडदोड थांबवण्यास यशस्वी ठरली आहे.
- जोसेफने मोडला ‘हा’ विक्रम
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफनं पदार्पणाच्या सामन्यातच आयपीएलचा 11 वर्षे जुना विक्रम मोडला. त्यानं शनिवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळताना अवघ्या 12 धावा देत 6 फलंदाजांना बाद केलं. यापूर्वी हा विक्रम राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज सोहेल तन्वीरच्या नावावर होता. त्यानं चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध 4 षटकांत 14 धावा देत 6 फलंदाजांना गारद केलं होतं. मुंबईनं हैदराबादविरुद्धच्या महत्वपूर्ण लढतीत लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजचा युवा गोलंदाज अल्जारी जोसेफला संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्यानं कमाल केली. हैदराबादचा स्फोटक फलंदाज वॉर्नरला त्रिफळाचित केलं. त्यानंतर विजय शंकर, हुड्डा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौलला तंबूत धाडलं. जोसेफच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादनं अक्षरशः नांगी टाकली.
