पेण : रामप्रहर वृत्त
पेण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नेतेमंडळी हिंगभर, तर कार्यकर्ते मूठभर. तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आहे. त्यामुळे कार्यक्रम करायचा तर व्यासपीठासमोर बसायला कार्यकर्तेच नसतात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ओढांगीच्या एका कार्यकर्त्या महिलेने वाशी येथे कार्यक्रम घेतला, पण तिला माहीत होते की कार्यक्रमाला गर्दी काही होणार नाही. म्हणून तिने आयडियाची कल्पना लढवून चुकीच्या पद्धतीने आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांना कोरोना काळात आपण काम केलंय म्हणून आपला सत्कार करायचे आहे असे सांगून म्हणजेच फसवून कार्यक्रम ठिकाणी बोलावले होते.
बिचार्या आशा वर्कर्स व अंगणवाडीसेविका दिवाळीची तयारी न करता आपला सत्कार होणार या आशेने 10 वाजताच कार्यक्रमस्थळी पोहचल्या, मात्र ज्यांना गर्दी दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप केला होता त्या प्रमुख अतिथी पालकमंत्री आदिती तटकरे या कार्यक्रमस्थळी उशिरा पोहचल्या. त्या अगोदर वाशी येथील बस निवारा शेडचा
लोकार्पण सोहळा झाला. बस निवारा शेडचा खर्च पाहता 50 ते 60 हजार रुपये, मात्र त्यावर निधी खर्च केला एक ते दीड लाख रुपये.
ओढांगी येथे कार्यक्रम होत असताना बिचार्या सकाळी आलेल्या आशा वर्कर्स व अंगणवाडीसेविका कार्यक्रमस्थळी ताटकळत बसल्या होत्या. व्यासपीठावर नेतेमंडळी दिसत होते, मात्र व्यासपीठाच्या खाली कार्यक्रमाला जी मंडळी जमवली होती ती म्हणजे आपले प्रामाणिक काम करणार्या आशा वर्कर्स व अंगणवाडीसेविका होत्या.
ज्या सत्काराच्या आशेने या महिला आल्या होत्या त्यांच्या अक्षरशः तोंडाला पाने पुसली गेली. सत्काराच्या नावाने या महिलांच्या भावनांशी खेळले गेले. आशा वर्कर्स व अंगणवाडीसेविकांचा विचारच झाला नाही आणि अंगणवाडीसेविकांना वस्तू दिल्या त्यामध्ये बादली, मग आणि चादर या वस्तूदेखील त्यांना न देता अंगणवाडीमध्ये ठेवून घ्या, अशी तंबी राष्ट्रवादीच्या स्थानिक महिला नेत्यांनी अंगणवाडीसेविकांना दिली. या किटवर रिलायन्स कंपनीचे नाव आहे, जे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या नावावर खपविण्यात आले. या वस्तूंसोबत पारलेजीचे 5-5 रुपयेवाले पुडे देण्यात आले. अशा प्रकारची वागणूक देऊन आरोग्याची व कुटुंबाची खर्या अर्थाने काळजी घेणार्या आशा वर्कर्स व अंगणवाडीसेविकांचा अपमानच केला गेला. सकाळी 10 वाजता आलेल्या या महिला भगिनींना 4 वाजता मोकळे केले. एवढ्या वेळात एक वडापाव देण्यात आला. ही बाब एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना न शोभणारी आहे. त्यामुळे कार्यक्रम राष्ट्रवादीचा आणि अन्नाविमा हाल झाले ते मात्र अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स व मदतनीस यांचे. यापुढे तरी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या स्थानिक नेत्यांना सूचनाच द्याव्यात व आरोग्याची काळजी घेणार्यांच्या भावनांशी खेळू नये, अशी चर्चा सुरू आहे.
आरोग्य कर्मचार्यांचा उल्लेखही नाही!
वाशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्सचा कोविड योद्धा म्हणून आपला पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी वाशी जगदंबा मंदिर येथे उपस्थित रहावे अशा आशयाचे पत्र साजन पाटील (पेण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिले होते, मात्र असे असताना सत्कार राहिला दूर, पण साधा उल्लेखही कार्यक्रमात करण्यात आला नाही. याचाच अर्थ फक्त कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचार्यांना बोलवले होते हे स्पष्ट झाले.
अधिकारी म्हणतात, सत्काराचा कार्यक्रम शासकीय नव्हता
अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना सत्कारासाठी वाशी येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलवल्याविषयी भ्रमणध्वनीवरून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी सांगितले की, आमच्या कार्यालयाबरोबर कोणताच पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे सत्कार कार्यक्रमासंदर्भात मला काहीही माहीत नाही. जरी तो कार्यक्रम असला तरी तो शासकीय कार्यक्रम नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.