राहुल गांधी यांनी व्यक्त केली खंत; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुनावले खडेबोल
वर्धा : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाची विचारधारा आक्रमकपणे आपल्याच लोकांमध्ये मांडली जात नसल्याची खंत पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी व्यक्त केली. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात झाली. या वेळी त्यांनी कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.
देशभरातील 30 राज्यातील काँग्रेसचे 200 निवडक पदाधिकारी या शिबिरात सहभागी झाले आहेत. चार दिवस विविध वक्ते या शिबिरात सहभागी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराची सुरुवात पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली. काँग्रेसच्या विचारधारेवर त्यांनी खंत व्यक्त केली.
काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे, पण आपण आपलीच विचारधारा काहीशी बाजुला ठेवली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आक्रमकपणे आपल्याच लोकांमध्ये मांडली जात नाही. पूर्वी काँग्रेस कार्यकर्ते पक्षाची विचारधारा समजून घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचवत होते पण त्यात थोडा खंड पडलेला दिसतो आहे. यासाठी सातत्याने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. भाजप आणि संघ यांनी काँग्रेसच्या विचारधारेला झाकोळले आहे. त्यांच्या हातात व्यवस्था आहे. आजच्या भारतात विचारधारेची लढाई ही सर्वांत महत्त्वाची आहे. विचारधारेचे प्रशिक्षण हे पक्षात सक्तीचे केले पाहिजे. काँग्रेसची कोणताही व्यक्ती वरिष्ठ असो किंवा कनिष्ठ असो हे प्रशिक्षण सक्तीचे असले पाहिजे. हे प्रशिक्षण वेगवेगळ्या स्तरावर राबवले गेले पाहिजे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. एकप्रकारे काँग्रेसचेच कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे विचारधारेपासून दूर गेल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले.
काँग्रेसची विचारधारा गावखेड्यापर्यंत तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी आधी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील दुःख व भीती दूर करणे गरजेचे आहे. त्यांच्या मनातील भीती व दुःख दूर करून त्यांना लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन राहुल गांधी यांना करावे लागले. या आवाहनातून एकप्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांमधील पक्षाविषयीची विचारधारा पसरविण्यात असलेला कमकुवतपणा राहुल गांधी यांनी सांगितल्याचे दिसून आले.