पाली : प्रतिनिधी
मृगगड किल्ला रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे. नियमित श्रमदान मोहिमेचा भाग म्हणून रविवारी (दि. 5) दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेचे नेतृत्व प्रशांत डिंगणकर यांनी केले.
आडवाटेतील हा किल्ला सुंदर निसर्गासह अतिशय महत्त्वपूर्ण वास्तूंनी सजलेला आहे. तो जपण्याचे व संवर्धनाचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान करीत आहे. या मोहिमेत गडावरील जोते आणि सदरेच्या तिन्ही बाजूंचा दगडांचा ढीग मोकळा करण्यात आला. किल्ल्यावरील वाढलेले गवत काढण्यात आले. पाण्याची टाकी, गडावरील वास्तू व मंदिर परिसरातील स्वच्छता केली गेली.
या मोहिमेत महेश सावंत, विशाल बामणे, प्रशांत डिंगणकर, अमित शिंदे, भूषण पाटील, रूपाली अवघडे, समाधान कांबळे, सिद्धार्थ बंदरकर, प्रशांत नंदी, जयेश भद्रिके, महेश सावंत, प्रतिक इंदुलकर, विजय गावंड, प्रतिक पाटेकर, गणेश चौगुले व रूपाली अवघडे आदींसह 20 सदस्यांनी सहभाग घेतला, तसेच अनिशा अवघडे ही छोटी दुर्गवीर सहभागी झाली होती.