मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. 12) आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली, मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने, तसेच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील विविध परीक्षांच्या आयोजनातील गोंधळाचे सत्र काही थांबताना दिसत नाही. आरोग्य विभागाच्या परीक्षांमधील गोंधळ संपतो न संपतो तोच आता म्हाडाच्या परीक्षेतील गोंधळ समोर आला आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा ट्विटर, तसेच म्हाडाच्या वेबसाईटवर एक व्हिडीओ पोस्ट करीत म्हाडाच्या विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी होणारी परीक्षा आता पुढील वर्षी होणार आहे, असे जाहीर केले. काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा आणि त्यानंतर होणार्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये, असे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले. या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून शनिवारीच हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे, बारामती आदी विविध केंद्रात पोहचले होते. त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागले. ही घोषणा आधीच किमान शनिवारपर्यंत केली असती तर नाहक धावपळ, त्रास वाचला असता असे सांगत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे स्पर्धा परीक्षेतील महाविकास आघाडीची गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली आहे. दरम्यान, पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द केल्याचे सांगण्यात येत असले, तरी विविध परीक्षांचे पेपर कसे काय फुटतात? सरकार यावर काही उपाययोजना करणार की नाही, असे सवाल विद्यार्थीवर्गातून उपस्थित केले जात आहेत.
दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे; देवेंद्र फडणवीसांची मागणी
म्हाडाच्या परीक्षेतील गोंधळ समोर आल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?’ असे फडणवीस म्हणाले आहेत, तसेच म्हाडा पेपरफुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या परीक्षांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. यातून सामान्य युवकांची फरपट होत आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई कराच, पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
हे सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करीत आहे. परीक्षार्थी परीक्षेच्या तयारीत असताना आदल्या रात्री परीक्षा रद्द करण्याचे पाप सरकार करतेय. पूर्णपणे या सरकारने बट्ट्याबोळ केला आहे. याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी.
-प्रवीण दरेकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते