मुंबई ः प्रतिनिधी
येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का, असा प्रश्न आहे. अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची शनिवारी मुंबईत सभा झाली, तसेच एमआयएमकडून तिरंगा रॅली काढण्यात आली, पण त्याला राज्य सरकारने ओमायक्रॉनचे संकट आहे, असे सांगून परवानगी नाकारली होती. तरीही रॅली आणि सभा घेतल्याने काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळणार का याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, एमआयएमच्या मुंबईतील सभेला परवानगी दिली नव्हती. जे नियम एमआयएमसाठी होते तेच नियम राहुल गांधी यांच्या सभेसाठी असतील. त्यामुळे राहुल गांधीच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.