नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएलचा बारावा हंगाम आता हळूहळू उत्तरार्धाच्या दिशेने प्रवास करीत आहे. प्ले-ऑफच्या गटात प्रवेश कऱण्यासाठी सर्व संघ प्रयत्नशील आहेत. मध्यरात्रीपर्यंत रंगणार्या सामन्यांना चाहते आवर्जून हजेरी लावत आहेत. गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाच्या हंगामातही टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे, मात्र यामध्ये महिला आणि लहानग्या चाहत्यांनी आघाडी घेतली आहे.
पहिल्या चार आठवड्यांमध्ये 41.10 कोटी लोकांनी आयपीएलच्या सामन्यांना पसंती दिली आहे. गेल्या हंगामात हा आकडा 41.40 कोटी इतका होता. यामध्येही महिला आणि लहान मुलांची संख्या 52 टक्के इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत पहिल्या चार आठवड्यांचा निकष लावला तर महिला प्रेक्षकांच्या संख्येत 15 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महिला चाहत्यांच्या संख्येमध्ये 8 कोटी 80 लाखांची वाढ झाली होती. यंदाच्या हंगामात ही वाढ 10 कोटी 10 लाखांपर्यंत पोहचली आहे.
बाराव्या हंगामातील प्रत्येक सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत रंगत आहे. त्यातच फलंदाजांची आक्रमक फटकेबाजी, गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये टिच्चून केलेला मारा यामुळे चाहते टीव्ही सेटला चिकटून बसलेले असतात. त्यामुळे यंदाच्या हंगामात कोणते संघ प्ले ऑफमध्ये जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.