लंडन : वृत्तसंस्था
आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आणि यजमान इंग्लंड संघ यांच्याकडे जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. या दोन्ही संघांची मागील दोन वर्षांतील कामगिरी ही उल्लेखनीय झाली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांकडून फार अपेक्षा केल्या जात आहेत, पण आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना यजमान इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंडचा प्रमुख फलंदाज अॅलेक्स हेल्स ड्रग्ज चाचणीत दोषी आढळला असून, त्याच्यावर 21 दिवसांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मेपासून सुरू होणार्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंडने नुकताच वन डे संघ जाहीर केला आणि त्यात हेल्सचाही समावेश होता. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या ड्रग्ज चाचणीत हेल्स दुसर्यांदा दोषी आढळला आहे.
यापूर्वी हेल्स आणि बेन स्टोक्स यांच्यावर मारामारी केल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे आताच्या नवीन प्रकरणामुळे हेल्सवर मोठी कारवाई होऊ शकते. कदाचित त्याला वर्ल्ड कप संघातूनही वगळले जाऊ शकते.
दरम्यान, हेल्सला वर्ल्ड कप संघात राहण्याचा अधिकार नाही, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केले आहे. हेल्सला कोणतीही सहानूभुती दाखवू नका, असेही वॉन म्हणाला.