Breaking News

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद -जिल्हाधिकारी

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत, मात्र कुठल्या प्रकारची दुकाने सुरू राहणार कुठली बंद राहणार याबाबत स्पष्टता होत नसल्याने सामान्य नागरीक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हा संभ्रम दूर केला आहे. निर्बंध कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने रविवारी अंशतः लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते, मात्र मंगळवारपासून दुकाने सुरू ठेवायची किंवा नाही. कुठली दुकाने सुरू ठेवायची याबाबतचा संभ्रम दूर झालेला नव्हता. अनेक व्यावसायिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे विचारणा करत होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार या कालावधीत किराणा, औषधे, भाजीपाला अशी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मॉल, अम्युजमेंट पार्क यावरदेखील निर्बंध आणण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या लग्नाचा हंगाम जोरात सुरू आहे. लग्न समारंभात 50पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास उपस्थित प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाईल, तसेच ज्या ठिकाणी लग्न असेल त्या संस्थेला किंवा जागा मालकाला 10 हजारांचा दंड आकारला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. जर एखाद्या हॉल किंवा रिसॉर्टवर दुसर्‍यांदा असा प्रकार आढळून आला तर ते सील करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. ही कारवाई करण्याची जबाबदारी सध्या नगरपालिका किंवा गाव पातळीवर ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या कारवाईचा रोजच्या रोज आढावा घेतला जाणार आहे. यासंदर्भात भरारी पथके तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. 

प्रवासी वाहतूक 50 टक्के

सार्वजनिक प्रवासी वाहतूकीत  वाहनाच्या आसन क्षमतेइतक्या प्रवाशांना प्रवास करता येईल, तर खाजगी प्रवासी वाहनांतून आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना प्रवास करता येईल. उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होईल.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply