पुणे : प्रतिनिधी
मागच्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची, तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा जोर असणार असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनची आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सिधी, अंबिकापूर, जमशेदपूर, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र, गोव्याच्या किनार्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे, तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …