बीजिंग : वृत्तसंस्था
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आणखी एका नेमबाजपटूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मि. एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसोबत अभिषेक वर्माने ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 2020 ऑलिम्पिकला पात्र ठरणारा अभिषेक भारताचा पाचवा नेमबाजपटू ठरला आहे.
पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अभिषेकने आपली आघाडी कायम ठेवली होती. 242.7 गुणांची कमाई करीत त्याने पहिले स्थान मिळवले. 29 वर्षीय अभिषेकचे नेमबाजी विश्वचषकातील हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. रशियाच्या
आर्तेम चेर्नोसॉव्हला रौप्य; तर कोरियाच्या सेयुंग्वो हानला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
या कामगिरीसह 10 मि. एअर पिस्तूल प्रकारात 2020 ऑलिम्पिकसाठी भारताने आपल्या दोन जागा नक्की केल्या आहेत. दिल्लीत झालेल्या स्पर्धेत सौरभ चौधरीने ऑलिम्पिक कोटा नक्की केला आहे.