अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ही चिंतेची बाब असली तरी, रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ती एक समाधानकारक बाब आहे. रायगडात सद्यस्थितीत दोन हजार 371 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 2238 जणांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने ते घरी विलगिकरण राहून उपचार घेत आहेत. 109 रुग्ण ऑक्सिजनवर असून 24 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. रायगड जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पुन्हा सर्व व्यवहार पूर्वपदावर आले होते. मात्र 2022 साल सुरू झाले आणि पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. 31 डिसेंबरपासून जिल्ह्यात रोज शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन हजार 371 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली होती. पहिला डोस 92 टक्के नागरिकांनी घेतला असून दुसरा डोस 72 टक्के नागरिकांनी घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील युवक, युवतींचेही लसीकरण सुरू आहे. लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आल्याने अनेकांच्या शरिरात प्रतिकार शक्ती वाढली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे अनेक कोरोना बाधित रुग्ण घरातच राहून उपचार घेत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.