कर्जत : बातमीदार
पेस्टल जर्नल हे चित्रकलेच्या जगतातील अत्यंत प्रसिद्ध असे मॅगझिन अमेरिकेतून प्रसिद्ध होते. त्या मासिकात कर्जत येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांचे चित्र प्रसिद्ध झाले होते. पेस्टल माध्यमातील या चित्राला अमेरिकेत पुरस्कार जाहीर झाला आहे.
पेस्टल जर्नल हे चित्रकलेवर आधारित पुस्तक गेल्या 21 वर्षापासून प्रकाशित होत आहे. या मॅगझिनमध्ये चित्रकला क्षेत्रातील पेस्टल या माध्यमाविषयी तसेच या माध्यमांमध्ये काम करणार्या जगभरातील चित्रकारांविषयी माहिती छापून येत असते.हे मॅगझीन दरवर्षी एका आंतरराष्ट्रीय चित्र स्पर्धेचे आयोजन करीत असते, त्यासाठी जगभरातून नावाजलेले चित्रकार आपली चित्रे पाठवत असतात. या मॅगझिनने त्यांच्या 2020 साठीच्या चित्रकला स्पर्धेमध्ये व्यक्तिचित्रण विभागामध्ये चित्रकार पराग बोरसे यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या मॅक्झिनकडून एवढ्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित होणारे पराग बोरसे हे पहिले आणि एकमेव भारतीय ठरले आहेत.
स्पर्धेसाठी पराग बोरसे यांनी त्यांचे शोल्डरिंग द लव या शीर्षकाचे चित्र पाठवले होते. हे चित्र वृद्ध मेंढपाळाचे असून एका मेंढीच्या पिल्लाला आपल्या नातवंडाप्रमाणे खांद्यावर खेळवतानाचे आहे. वृद्ध धनगराच्या चेहर्यावरील मायेने भरलेले भाव चित्राची खासियत आहे. पेस्टल जर्रनल हे मॅक्झिन आपल्या आगामी एप्रिलमधील अंकात पराग बोरसेंच्या चित्रांविषयी व त्यांच्या आजवरच्या कलाप्रवासाविषयी माहिती देणारा एक लेखही प्रसिद्ध करणार आहे. यापूर्वी 2013 मध्ये पेस्टल जर्नल या मॅगझिनने पराग बोरसे यांना जगातील त्या वर्षीच्या पहिल्या पाच चित्रकारांमध्ये समाविष्ट करून त्यांना एक विशेष पुरस्कारही प्रदान केला होता.