कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी आढळलेले पाचही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या 171वर गेली आहे.
मंगळवारी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी धाकटे वेणगाव येथील 19 वर्षांचा युवक पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीमध्ये दररोज कामासाठी ये-जा करीत आहे, तर नेरळनजीकच्या दामत येथील 57 वर्षांची महिला लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासून मुंबईत राहत आहे, मात्र तिचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तडे नेरळनजीकच्याच ममदापूरमधील 67 वर्षीय व्यक्ती आजारी असते. त्या व्यक्तीची स्वॅब टेस्ट केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
माणगाव वरेडी येथील डिग्निटी लाइफ स्टाइल या नावाने असलेल्या विश्रामगृहात राहत असलेल्या 82 वर्षांच्या वृद्धाचा कोरोना टेस्टचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचे कुणीही नातलग नाहीत. तांबस येथील 24 वर्षांच्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक रिलायन्समध्ये अडीच महिन्यांपूर्वी काम करीत होता. आठ दिवसांपूर्वी तो रिलायन्स कंपनीत इंटरव्ह्यूला गेला होता. त्यांनतर तो या आठ दिवसांत अनेकांना भेटल्याने त्यांच्यामध्ये घबराट पसरली आहे. तालुक्यात मंगळवारी पाच नवे रुग्ण आढळले असून एकूण 171 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 120 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून 44 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. यामधील काही रुग्ण घरीच क्वारंटाइन झाले असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
उरण तालुक्यात 14 कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू
उरण ः प्रतिनिधी
उरण तालुक्यात मंगळवारी (दि. 7) मोरा येथील दोन, जसखार तीन, सोनारी तीन, बोकडवीरा, पागोटे, नागाव व पाणजे येथे प्रत्येकी एक व उरण दोन असे 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
उरण तालुक्यातील पागोटे, नवीन शेवा, गोवठणे, चिरनेर व हनुमान कोळीवाडा येथील प्रत्येकी एक अशा पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण येथील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 368 झाली आहे. त्यातील 247 बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 114 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार
घेत आहेत. आतापर्यंत आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
कोर्लईतील वृद्धाचा मृत्यू; एकदरा येथे सहा पॉझिटिव्ह रुग्ण
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील 62 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या आता चारवर पोहचली असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मुरूड तालुक्यात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुरूड तालुक्यात नुकतेच 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यावर दोन दिवसांतच एकदरा भागात सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रुग्णसंख्या कमी होण्यासाठी प्रशासन वेगवगेळ्या
उपाययोजना आखत असतानासुद्धा कोरोनाबाधितांच्या केसेस वाढत आहेत.
कोर्लई येथील रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाइकांसह आजूबाजूच्या लोकांना मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात स्वॅब चाचणीकरिता आणल्याची माहिती मुरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी दिली. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खोपोली नगरपालिका क्षेत्रात 57 कोरोनाग्रस्त
खोपोली ः प्रतिनिधी
खोपोली नगरपालिका क्षेत्रात मंगळवारपर्यंत एकूण 57 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या तपासणी अहवालानुसार नवीन तीन रुग्णांची भर
पडली आहे.
यातील 38 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून दुर्दैवाने यादरम्यान तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर संपूर्णपणे तंदुरुस्त होऊन 16 रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रात सोमवारपर्यंत एकूण 140 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असल्याची माहिती नगरपालिका आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, नगरपालिकेकडून परराज्यातून खोपोलीत आलेल्या 344 जणांचे घरातच अलगीकरण करण्यात आले आहे, तर परदेशातून परतलेले व कोरोनाबधितांच्या संपर्कातील अशा एकंदरीत 981 जणांचेही अलगीकरण करण्यात आले आहे.
महाडमध्ये पती-पत्नीला कोरोनाची लागण
महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यात कोरोना रुग्ण आढळण्याची श्रृंखला सुरू असून चांढवे येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे याच गावातील पती-पत्नीला लागण झाली आहे. त्यांच्यावर महाड येथे उपचार सुरू आहेत. महाड तालुक्यातील चांढवे गावातील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे याच गावातील 41 वर्षीय पुरुष आणि त्याची पत्नी या दोघांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसल्याने होम आयसुलेट करून घरीच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. सध्या महाड तालुक्यात 34 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 38 रुग्ण बरे झाले आहेत. आठ जणांचा मृत्यू झाला असून एकूण संख्या 80 झाली आहे.
रोहा तालुक्यात 17 कोरोनाबाधित; 20 जणांची संसर्गावर मात
रोहे ः प्रतिनिधी
रोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रोहा तालुक्यात मंगळवारी एकाच दिवसात 17 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे.
रोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रोहा, वरसे, धाटाव आदी बाजारपेठ व गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, परंतु कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग थांबत नसून कोरोनाचा फैलाव होत आहे. दुसरीकडे रोहेकरांसाठी दिलासा म्हणजे मागील दोन दिवसांत 32 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.
रोहा तालुक्यात मंगळवारी 17 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून यामध्ये रोहा शहरात 11, तर ग्रामीण भागात सहा कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. यामध्ये नऊ महिलांचा, तर आठ पुरुषांचा समावेश आहे. रोहा तालुक्यात मंगळवारी एका दिवसात 20 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. रोहा तालुक्यात आतापर्यंत एकूण रुग्ण 202 झाले असून सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 110 झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत 90 व्यक्तींनी कोरोनावर मात करीत बरे होत घरी गेले आहेत, तर दोन लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.