Breaking News

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : हरेश साठे
दिवाळी अंकांनी साहित्य घडविण्याचे काम केले. मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी उचलली आहे. म्हणून भरघोस रकमेची पारितोषिके असलेली राज्यातील सर्वांत मोठी दिवाळी अंक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून दरवर्षी भरवली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले. ते खांदा कॉलनी येथे झालेल्या दिवाळी अंक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 5) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) मोठ्या उत्साहात आणि समारंभपूर्वक झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास फुटाणे बोलत होते.
कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी महासंचालक तथा जलसंधारण विभागाचे सचिव दिलीप पांढरपट्टे, ललित मासिकाचे स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, दीपक म्हात्रे, तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रामदास फुटाणे यांनी पुढे बोलताना, पुस्तकातून आत्मसंवाद आणि त्यातून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे इंग्रजी ज्ञानभाषा असली तरी निर्णयक्षमता मातृभाषेत आहे. मराठी महाराष्ट्राची राजभाषा असताना महाराष्ट्रातील अनेक मंत्री प्रसारमाध्यमांना मराठीत बाईट दिल्यानंतर पुन्हा हिंदी भाषेत त्याचे रूपांतर करीत बाईट देतात. हा अवघड प्रश्नच असून मराठीच्या मारेकर्‍यांचा शोध लावला पाहिजे, असे आपल्या शैलीत सांगत मराठीला स्वतःहून सन्मान दिला पाहिजे, असे अधोरेखित केले.
या वेळी रामदास फुटाणे यांनी कोरोना व इतर विषयांवर कविता सादर करीत अदृश्य कोरोनाने जगण्याचे भान दिले असल्याचे आवर्जून नमूद केले. राज्यातील कानाकोपर्‍यातून दिवाळी अंक या स्पर्धेसाठी येतात ही अभिनंदनीय बाब आहे, असे सांगतानाच ही स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ असल्याचे त्यांनी म्हटले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवा, शिक्षणसेवा, सांस्कृतिक सेवा असे विविध गुण आहेत. एकाच व्यक्तीत एवढे कर्तृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर एकमेव असतील, असे गौरवोद्गार काढत हे आदर्श व्यक्तिमत्व मलासुद्धा प्रेरणा देतो, असेही त्यांनी दिलखुलासपणे सांगितले.
राज्यस्तरीय सन 2018च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ’अधोरेखित’ दिवाळी अंकाने, द्वितीय ’चतुरंग अन्वय’, तृतीय ’झपूर्झा’, सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंक ’वयम’, उत्कृष्ट विशेषांक ’अ‍ॅग्रोवन’, उत्कृष्ट कथा ’चंद्रकांत’, उत्कृष्ट व्यंगचित्र ’हास्यधमाल’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ’दीपावली’; सन 2019च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ’शाश्वत वनीकरण’ आणि ’उद्याचा मराठवाडा’, द्वितीय (विभागून) ’दीपावली’ आणि ’पुरुष उवाच’, तृतीय क्रमांक (विभागून) ’दुर्ग-शोध गडकिल्यांचा’ आणि ’दुर्गाच्या देशातून’, उत्कृष्ट विशेषांक ’समपथिक’, उत्कृष्ट कविता ’खोडलेली कविता-कालनिर्णय’, उत्कृष्ट व्यंगचित्र ’दीपावली’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ’चतुरंग अन्वय’, उत्कृष्ट अंतर्गत सजावट ’अक्षरधारा’; तर सन 2020च्या स्पर्धेत ’अनलॉक’ आणि ’लोकदीप’ या अंकांनी विभागून प्रथम क्रमांक, ’संवादसेतू’ व ’आंतर-भारती’ या अंकांनी विभागून द्वितीय क्रमांक, ’कुबेर’ व ’ओंजळीतील अक्षरे’ या अंकांनी विभागून तृतीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंक ’छावा’, उत्कृष्ट विशेषांक ’तेजोमय’, उत्कृष्ट कथा ’पॉपी टिअर (व्यासपीठ)’, उत्कृष्ट कविता-सकाळ (’खरवडून पाहीन म्हणते’), उत्कृष्ट व्यंगचित्र ’आक्रोश (संजय मिस्त्री)’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ’दीपावली’ व उत्कृष्ट अंतर्गत सजावटीचे पारितोषिक ’किल्ला’ या अंकाने पटकाविला.
रायगड जिल्हास्तरीय 2018च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ’साहित्यआभा’ अंकाने, द्वितीय ’लोकसेवक’, तृतीय ’उरण समाचार’; सन 2019च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ’पर्ण’, द्वितीय ’उरण समाचार’, तृतीय वादळवारा; तर सन 2020च्या स्पर्धेत ’आगरी दर्पण’ने प्रथम, ’इंद्रधनु’ने द्वितीय आणि ’रामप्रहर’ अंकाने तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक रक्कम धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, अरविंद कुलकर्णी, प्रा. डॉ. दीपा ठाणेकर, महेश कुलसंगे, प्रा. नम्रता पाटील, सुनील कर्णिक, प्रा. डॉ. अलका मटकर, प्रा. जयप्रकाश लब्दे, विजय कुलकर्णी, प्रा. वर्षा माळवदे, नम्रता कडू, रामदास खरे, प्रतिष्ठा सोनटक्के यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक म्हात्रे यांनी, तर परीक्षक मनोगत नीला उपाध्ये यांनी व्यक्त केले. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचा लाभ साहित्यप्रेमींनी घेतला, तसेच दिवाळी अंक स्पर्धेसंदर्भात मल्हार टीव्हीच्या माध्यमातून सादर झालेल्या डॉक्युमेन्ट्रीचे उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमींनी कौतुक केले.

पुढच्या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांच्या बक्षीस रकमेत भरघोस वाढ
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिले साहित्यप्रेमींना बळ
भरघोस पारितोषिक असलेली ही सर्वांत मोठी दिवाळी अंक स्पर्धा… राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला 75 हजार रुपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक 30 हजार रुपये असे स्वरूप… लोकनेते रामशेठ ठाकूर भाषणाला उभे राहिले… त्यांनी पुढच्या वर्षीपासून राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी थेट एक लाख रुपये, तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आणि पुढील क्षणी टाळ्यांच्या कडकडाट सर्व साहित्यिक, कवी, लेखक, निर्माते, साहित्यप्रेमींनी लोकनेते ठाकूर यांच्याप्रती आभार व्यक्त केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर प्रथम दिवाळी अंकाचे प्रणेते का. घ. मित्र यांच्या जीवनावर साहित्यविश्वात एकही पुस्तक अद्यापपर्यंत अस्तित्वात आले नाही याची खंत या कार्यक्रमात रविप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना तुम्ही पुस्तकाच्या निर्मितीच्या कामाला लागा. मी का. घ. मित्र यांचे चरित्र पुस्तकरूपी प्रसिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेन, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर करीत त्यांना आश्वस्थ केले. त्यामुळे या समारंभात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साहित्यप्रेमींच्या भावना जपत त्यांना बळ देण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा पारितोषिक
प्रथम क्रमांक : 75 हजार रुपये व सन्मानचिन्ह
व्दितीय क्रमांक : 35 हजार रुपये व सन्मानचिन्ह
ततीय क्रमांक : 20 हजार रुपये व सन्मानचिन्ह
उत्कष्ट कथा : 7 हजार रुपये
उत्कष्ट कविता : 2500 रुपये
उत्कष्ट व्यंगचित्र : 2500 रुपये
उत्कृष्ट विशेषांक : 5 हजार रुपये,
उत्कृष्ठ मुखपृष्ठ : 5 हजार रुपये,
सर्वोत्कष्ट बालसाहित्य : 7500 रुपये

रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा पारितोषिक
प्रथम क्रमांक : 30 हजार रुपये व सन्मानचिन्ह
व्दितीय क्रमांक : 15 हजार रुपये व सन्मानचिन्ह
ततीय क्रमांक : 7500 रुपये व सन्मानचिन्ह

मराठी साहित्य संस्कृतीला उज्ज्वल परंपरा असून दिवाळी अंक हा यातील अविभाज्य भाग आहे. दिवाळीला जसे दारात आकाशकंदील लागतात, तसे मनामनांत विचारांचे कंदील चेतवण्याचे काम दिवाळी अंक करतात. साहित्य आपल्याला आत्मिक सुख देते. त्यामुळे मातृभाषेची किंमत अनन्यसाधारण आहे.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

कोरोनाच्या संकटात लाटा येतच राहाणार आहेत. कितीही लाटा येऊ द्या, प्रत्येक क्षण आनंदाने जगले पाहिजे. 2020-21मध्ये जिवंत राहण्याचे चॅलेंज होते ते वर्ष सरले ,पण आता प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माझी जुनी ओळख आहे. आजही त्यांच्याकडे जाण, नम्रपणा आहे. त्यामुळे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याप्रती भावना आहेत.
-दिलीप पांढरपट्टे, कवी व गझलकार

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादामुळे या स्पर्धेचे आयोजन केले जात असून महाराष्ट्रातील सर्वांत मोठी म्हणून ही स्पर्धा सुपरिचित आहे. दिवाळी अंक महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे आणि त्याला प्रोत्साहन देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इतिहासात सर्वांत मोठी देणगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली असून त्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत.
-नरेंद्र वाबळे, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply