- मदार मोर्चा बदलावरून शिवभक्तांमध्ये संताप
- छत्रपती संभाजीराजेंची पुरातत्त्व विभागाकडे तक्रार
महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगडावरील मदार मोर्चा येथील बांधकामाला पांढरा रंग फासून व तेथे चादर चढवून होत असलेल्या प्रकाराने शिवभक्तांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. या प्रकाराबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. 6) पुरातत्त्व विभागास पत्र देऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी दुर्गराज रायगडावरील मदार मोर्चा येथे येथील बांधकामाला पांढरा रंग फासला व तेथे चादर चढवून ते प्रार्थनास्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना किल्ले रायगडसारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी मदार मोर्चा या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तत्काळ पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
पुरातत्त्व विभागाने घेतली दखल
किल्ले रायगड हा संवेदनशील विषय असून या गोष्टीला पायबंद घातला नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या शिवभक्तांच्या भावना लक्षात घेत किल्ले रायगडावरील मदार मोर्चाप्रकरणी पुरातत्त्व विभागाने या वास्तूला लावलेला पांढरा रंग काढून टाकला आहे, तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.