ख्राइस्टचर्च ः वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा महान फलंदाज रॉस टेलर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी बांगलादेशविरुद्ध ख्राइस्टचर्चच्या मैदानावर उतरला. या वेळी टेलर खूपच भावूक झाला. नाणेफेकीनंतर राष्ट्रगीत सुरू असताना टेलरचे डोळ्यांत पाणी आले आणि तो शेवटपर्यंत आपले अश्रू रोखू शकला नाही. टेलरचा भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 30 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो न्यूझीलंडकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे, तर बांगलादेशविरुद्धचा सामना त्याचा अखेरचा कसोटी सामना आहे. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम टेलरच्या नावावर आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.