321 विद्यार्थ्यांवर दोन परीक्षा बंदीची कारवाई
औरंगाबाद ः प्रतिनिधी
सामूहिक कॉपी प्रकरणात विभागीय शिक्षण मंडळाने गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील 321 विद्यार्थ्यांवर वन प्लस टूची कारवाई केली. या कारवाईमुळे झालेल्या परीक्षेचे संपादित गुण रद्द करत पुढील जुलै आणि मार्च 2020मध्ये होणार्या परीक्षेस विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच दोषी शिक्षकांवर फौजदारी कारवाई करावी, असे आदेश माध्यमिक शिक्षण विभागास शनिवारी दिले. सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स. भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर मार्चमध्ये भरारी पथकाने भेट दिल्यानंतर दहावीच्या बीजगणित विषयाच्या पेपरला सामूहिक कॉपी सुरू असल्याचे आढळून आले होते. शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत होते. काही शिक्षक तर पेपर लिहून देत होते. कॉप्यांच्या झेरॉक्स काढून त्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत होत्या. यात 321 विद्यार्थी दोषी आढळून आले. बोर्डाकडून झालेल्या चौकशीचा अहवाल समितीसमोर ठेवण्यात आला होता. विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांना वन प्लस टू म्हणजे दोन परीक्षांसाठी डिबार केले आहे. झालेल्या पेपरचे संपादित गुणही रद्द करण्यात आले आहेत. तसेच दोषी तीन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना देण्यात आले आहेत. शनिवारी बोर्डाच्या तदर्थ समितीमार्फत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकार्यांना अहवाल देण्यात आला.