नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार देशभरात सोमवार (दि. 10)पासून पात्र व्यक्तींना बूस्टर (प्रिकॉशन) डोस देण्यात येणार आहे. या संदर्भातील तयारी आरोग्य विभागाने केली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्या व्यक्ती कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. यासाठी कोविनवर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या संदर्भातील ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा शुक्रवारपासून सुरू झालेली आहे. तथापि बूस्टर डोस हा दुसरा डोस घेतल्यानंतर नऊ महिने अथवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील तरच उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे दुसरा डोस घेतल्यानंतर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यास नऊ महिने व अधिक 90 दिवसानंतर बूस्टर डोस घेता येणार आहे. पात्र व्यक्तींनी आवर्जून लस घ्यावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.