नागोठणे : प्रतिनिधी
गोवंश जातीच्या प्राण्यांची बेकायदेशीरपणे कत्तल करून ते मांस अवैधरीत्या मुंबई येथे विक्रीसाठी नेणार्या पाच जणांच्या टोळीला नागोठणे पोलिसांनी रविवारी (दि. 16) जेरबंद केले आहे. त्यात नागोठणे येथील तिघांचा समावेश आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे आपल्या पथकांसह रात्रीची गस्त घालत घालत असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास एक पिकप जीप आणि टाटा इंट्रा कंपनीचा छोटा टेम्पो संशयास्पदरीत्या आढळून आली. या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 250 किलो वजनाचे व सुमारे एक लाख 90 हजार रुपये किमतीचे प्राण्यांचे तुकडे केलेले मांस आढळून आले. याशिवाय या वाहनांच्या बाजूला सुमारे चोवीस हजार रुपये किमतीच्या तीन गायी आढळून आल्या. याशिवाय घटनास्थळी एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक लोखंडी सुरा सापडला. या गुन्ह्यात एकूण सहा लाख 58 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळी हस्तगत केला. या गुन्ह्यात सलीम सिंधी (वय 52, रा. आझाद मोहल्ला, नागोठणे), इम्रान मुल्ला (वय 36) व नबाब शेख (वय 23, दोन्ही रा. मिरानगर, नागोठणे), चालक विजय आरोट (वय 25, रा. रमाई कॉलनी, घाटकोपर-मुबई), नदीम कुरेशी (वय 28, रा. टाटानगर, गोवंडी-मुबई) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नारायण चव्हाण करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई, हेड कॉन्स्टेबल नितीन गायकवाड, ब्रिजेश भायदे, पोलीस नाईक मिथून मातेरे, सत्यवान पिंगळे, कॉन्स्टेबल रामनाथ ठाकूर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.