पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलण्याची वेळ आता आली असून, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी (दि. 3) पेण येथे केले.
भाजप-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी गुरुवारी माजी आमदार अनिलभाऊ तटकरे, ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, भाजप रायगड जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज पेण विधानसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे सादर केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत भंडारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. रविशेठ पाटील यांच्यासारख्या काम करणार्या आमदाराची आज राज्य विधिमंडळाला गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
अनेक वर्षांपासून विधानसभेचा पेण मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. तो अनुशेष भरून काढण्यासाठी रविशेठ पाटील यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून चांगली संधी चालून आली असून, सर्वांनी या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेऊन विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याचे काम आपल्याला 21 ऑक्टोबरला करायचे आहे. राज्यात पुढची सत्ता महायुतीचीच येणार आहे. भाजपने रविशेठ पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना विजयी करून ही निवड योग्य असल्याचे आपणा सर्वांना दाखवून द्यायचे आहे, असे माधव भंडारी यांनी सांगितले.
पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विद्यमान आमदाराच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचून महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. भाजप नेते बंधू पाटील, जि.प.चे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, आरपीआयचे सुरेश वाघमारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राऊत, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, मिलिंद देशमुख, आरपीआयचे प्रतीक मढवी यांनीही आपल्या भाषणातून रविशेठ पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
तत्पूर्वी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पेण येथील वैकुंठ निवासस्थानापासून रॅली काढली होती. रॅलीत जि.प.च्या माजी सदस्या कौसल्या पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, मारुती देवरे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, वैकुंठ पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, राजेश मपारा, भाजप पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, तालुका उपाध्यक्ष वसंत मोकल, सुधागड तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, चेतन मोकल, अच्युत पाटील आदींसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
10 वर्षांपूर्वी आपण या मतदारसंघातून रविशेठ पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे विरोधकांचा फायदा झाला होता. त्या वेळी निवडून आणलेल्यांनी 10 वर्षांत कोणताही विकास न करता फक्त लोकांना आश्वासने देण्याचे काम केले. आता या निवडणुकीत आम्ही एकत्र आलो असून रविशेठ पाटील यांना विजयी करणार आहोत. -अनिलभाऊ तटकरे, माजी आमदार