सातारा ः प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी खूप प्रभावी काम केले होते. त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रयत’ने शनिवारी (दि. 22) यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स महाविद्यालयात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करून शोकसभेचे आयोजन केले होते.
या शोकसभेस मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, माजी आमदार लक्ष्मण माने, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य विठ्ठल शिवणकर, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे
डॉ. हमीद दाभोळकर, उच्च शिक्षण सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, कौन्सिल सदस्य अॅड. दिलावर मुल्ला, सहसचिव संजय नागपुरे, ऑडीटर प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य आर. डी. गायकवाड, प्राचार्य शेजवळ, जनरल बॉडी सदस्य बी. जी. शेवाळे, जयवंतराव पाटील, प्राचार्य यशवंत पाटणे, दिनकर झिंब्रे, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कच्या वतीने प्रा. अजित साळुंके आदी उपस्थित होते, तसेच यू-ट्युबच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, देणगीदार, संस्थेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक शोकसभेस लिंकद्वारे सहभागी झाले होते.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे माजी कार्याध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. रयत शिक्षण संस्थेत 78 वर्षे योगदान देणारे रयत शिक्षण संस्थेचे ते भीष्माचार्य होते. संस्था कशी असावी, कशी चालवावी याचा वस्तुपाठ ‘एनडी’ सरांनी घालून दिला. रयत शिक्षण संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण व संगणकीय शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. संस्थेत मेरीटचे शिक्षक मिळावे यासाठी एमकेसीएलमार्फत परीक्षा घेऊन गुणवत्तेने शिक्षक नेमण्यास ‘एनडी’ सरांनी जाणीवपूर्वक आग्रह धरला होता.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, एन. डी. पाटीलसाहेबांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी विविध क्षेत्रांत असामान्य काम केले. सन 1964पासून मी त्यांच्या संपर्कात होतो. विद्यार्थीदशेतसुद्धा त्यांना पाहत होतो. त्यांनी सतत मायेचा हात अनेकांना दिला. ते लोकांच्यात राहणारे नेते होते. गोरगरीब, दीन- दुबळ्यांच्या न्यायाचा ध्यास हाच एन. डी. पाटीलसाहेबांचा श्वास होता. समाजाला धोका होत असेल तर ते कणखर भूमिका घेत. त्यांचा वारसा जपणे हे माझे आणि तुमचे कर्तव्य आहे. या वेळी इतर मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …