Breaking News

प्राचीन पल्लीपुर (पाली)

सरसगडाच्या कुशीत, बल्लाळेश्वराच्या कृपाशीर्वादाखाली आणि अंबा नदीच्या तीरावर विसावलेले गाव म्हणजे पाली. दैदिप्यमान इतिहास अनुभविलेल्या आणि आधूनिक काळात विकासाच्या वाटेवर असलेल्या पाली गावाने अनादिकाळापासून अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वतंत्र चळवळीचा वारसा लाभलेल्या या गावाची रंजक ओळख…

घाटमाथ्यावरवरुन कोकणात उतरताना प्रमुख ठाण्याला पोहोचण्यापूर्वी ज्या भागात तळ द्यायचा त्याला ’पाल’ पडणे म्हणजे ’तळ पडणे’ असे म्हणत. येथे अशा प्रकारचे पाल पडत. त्यामुळेच या गावाचे नाव ’पाली’ पडले असावे. फार पूर्वी या गावाला पल्लीपूर, पल्लीपतन व नागस्थान अशीही नावे होती.

अष्टविनायकांपैकी एक  बल्लाळेश्वर देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पाली या गावी आहे. हे प्राचीन देवस्थान असून अत्यंत रमणीय व सर्वांगसुंदर असे स्थान आहे. श्री बल्लाळेश्वराचे कथेचा उल्लेख श्री गणेश पुराण अध्याय 22/23 (उपासना खंड) व मुद्गल पुराण खंड 8 अध्याय 38/39 यांत वर्णिला आहे. पाली या गावाचे नाव पूर्वी पल्लीपूर असे होते व येथील भक्त बल्लाळ याने अंतकरण पूर्वक केलेल्या भक्तीमुळे गणपती ब्राम्हण रुपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यामुळे बल्लाळाने वर मागताना गणपतीकडे प्रार्थना केली की, तुम्ही माझ्या नावाने येथे वास्तव्य करावे व तुमची मनोभावे प्रार्थना केल्यावर भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. त्यामुळे सदर स्थानास बल्लाळेश्वर असे म्हटले जाते व नवसाला पावणारा गणपती असे म्हटले जाते, अशी आख्यायिका आहे.

* मंदिराची सुरेख रचना *

श्री बल्लाळेश्वर मंदिर हे फार पूर्वी लाकडी होते. त्यानंतर नाना फडणीसांनी सदर मंदिराचा जीर्णोध्दार करून इ.स.1770 च्या सुमारास पाषाणी मंदिर बांधले.  हे मंदिर पुर्वाभिमुख आहे. दक्षिणायनात सूर्योदय होताच सूर्याची किरणे नेमकी श्रींवर पडतात. मंदिरास दोन गाभारे असून आतील गाभारा विस्तृत आहे. त्यात श्रींची स्वयंभू मुती आहे. पुढील गाभार्‍यात श्रींच्या समोर उंदीर बसवण्यात आला आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम बारा फुट रुंदीच्या दगडात केले असून प्रत्येक सांध्यावर शिसे ओतण्यात आले आहे. सभामंडपासमोर मोठी घंटा असून सदरची घंटा चिमाजीआप्पा पेशवे यांनी वसई किल्ला जिंकला त्यावेळी सोडविलेल्या लुटीपैकी असून ती पेशव्याकडून सदर मंदिरास दिली गेली आहे. 1952 मध्ये मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा अस्तित्वात आल्यावर सदर मंदिराची नोंदणी सार्वजनिक धार्मिक संस्था म्हणून झाली. संस्थेचा कारभार सुव्यवस्थित व्हावा म्हणून 1991 मध्ये संस्थेची योजना मंजूर झाली. या योजनेनुसार संस्थेचा कारभार व्यवस्थित चालू आहे.

* पालीचे ऐतिहासिक प्रतीक-सरसगड किल्ला *

प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले पाली हे गाव सरसगडाच्या कुशीत वसले आहे.  शिवाजी महराजांनी या गडाचे महत्व ओळखून गडास स्वराज्यात दाखल करुन घेतले. आणि सरसगडाच्या दुरुस्तीसाठी दोन हजार होन मंजूर केल्या होत्या. यानुसार दुर्गमाता व विपूल जलसंचय यावर विशेष भर देवून गडाची बांधणी करण्यात आली. दूरवर टेहाळणी करण्यास व इशारा देण्यास सरस म्हणून किल्ल्यास सरसगड नाव देण्यात आले.

पालीतून किल्यावर पोहचायला साधारण एक तास लागतो. अग्निजन्य खडकापासून बनलेल्या या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 490 मिटर आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजुकडील 111 पायर्‍या सलग एकाच दगडात घडविलेल्या असून त्या उंच व प्रशस्त आहेत. चुना व घडीव दगडांचा उपयोग करुन किल्ल्याला बुरुज व तटबंदी करण्यात आली आहे. दक्षिणेकडील दरवाजा दिंडी दरवाजा म्हणून ओळखला जातो. उत्तरेकडून किल्ला चढून गेल्यावर प्रवेशद्वाराजवळ मोती हौद आहे. या हौदातील पाणी अतिशय थंड व स्वच्छ असून ते बारामाही उपलब्ध असते. या हौदाची खोली तीन मिटर आहे. किल्ल्यावर घोड्याची पागा, धान्य कोठारे, शस्त्रागारे, कैदखाने, दारू कोठारे व देवळ्या बांधण्यात आली आहेत. तोफा व बंदूकांचा वापर करण्यासाठी बुरुज व तटास अनेक छिद्रे (जंग्या) ठेवण्यात आली आहेत. बालेकिल्ल्यावर जागेचे क्षेत्रफळ अर्धा हेक्टर आहे. या जागेत जोगेश्वरी (केदारेश्वर) मंदिर व त्याभोवती तळे आहे. तसेच शहापिर दर्गा आहे. वैशाख पोर्णिमेला दर्ग्याचा उरुस भरतो तर श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला केदारेश्वराच्या दर्शनासाठी किल्ल्यावर भाविकांची गर्दी असते. सरसगड किल्ल्याचाच भाग असलेला सलग दगडांचा एक जुळा किल्ला पाठिमागे उभा आहे. या भागास तीन कावडी असे म्हणतात.

1962 साली पंचायतराज व्यवस्थेची निर्मिती झाल्यावर कुलाबा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून पालीचे के. गो. तथा दादासाहेब लिमये यांची निवड झाली.

* शिक्षणाचा वारसा *

हरी लागू, गणपतराव वडेर, ल.के. भावे, दादासाहेब माने आदिंसह अनेकांना स्वातंत्र्य पुर्व काळात पालीला इंग्रजी शाळा स्थापन केली. जानेवारी 1941 मध्ये ही शाळा सुधागड एज्युकेशन सोसायटी म्हणून रजिस्टर झाली. 1967 साली दादासाहेब लिमये सुधागड एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष झाले. त्यांनीच कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली आहे. या दोन्ही संस्थांच्या शाळा, महाविद्यालयांमधून हजारो मुले ज्ञानाचे धडे गिरवीत आहेत. पालीतील दानशूर शिक्षणप्रेमी जमशेटजी नवरोजी पालीवाला यांच्या नावाने 1989 मध्ये कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय सुरु झाले. आज येथे आजूबाजूच्या गावातील व तालुक्यातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत.

स्वातंत्र्यलढा आणि छोडो भारत आंदोलनातही पालीकरांचा सहभाग होता. ब्रिटीश सरकारला प्रतिकार करण्यासाठी पालीतील राजाभाऊ चांदवडकर यांनी 1930 मध्ये आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने तारांचे खांब कापून टाटा कंपनीकडून मुंबईला होणारा वीजपुरवठा बंद केला होता. रामजीभाई मेहता 1921 च्या मुळशी सत्याग्रहात सेनापती बापट यांना मदत केली होती.  चले जाव आंदोलनामध्ये पाली गावात सत्याग्रह करण्यात आला होता. यावेळी बापुसाहेब लिमये, रामजीभाई मेहता व अन्य सत्याग्रहींना उन्हेरे येथे अटक झाली होती. त्याचबरोबर पुरुषोत्तम लिमये, धोंडू ढेबे, शांताराम मुळे, वसंत दुर्वे, सिद्धेश्वर कोनकर यांनाही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्याबद्दल कारावास झाला होता. केदारनाथ कुलकर्णी यांनी छोडो भारत आंदोलनात भाई कोतवाल यांच्या पथकातील भूमिगत क्रांतीकारांना मार्गदर्शन केले होते.

-धम्मशील सावंत, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply